समाजमाध्यमांवर एकमेकांविरोधात शाब्दिक चकमक

पालघर: मुंबईतील दादर, क्रॉफेड मार्केट येथील मासळी बाजार हटवण्याचे पालघर जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी मासळी बाजार बंदची हाक दिली गेली असली तरी या मुद्दय़ावरून मच्छीमार समुदायांमध्ये एकमेकात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. समाजमाध्यमांवर मच्छीमार समूहावर एकमेकांविरोधात धुमश्चक्री सुरू असल्याचे दिसत आहे.

पालघर जिल्ह्यत मच्छीमार समाज एकत्रित असला तरी समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या एकमेकांच्या धुमश्चक्रीवरून त्यांचा अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे. एकमेकांवर विविध विषयांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे मच्छीमार समुदाय विखुरला गेल्याचे समाजमाध्यमाच्या विविध पोस्टवरून दिसून येत आहे.

मुंबईमध्ये हटवल्या जाणाऱ्या मासळीबाजार यासाठी किनारपट्टी भागात ‘मच्छीमार जन आंदोलन’ उभे राहत आहे. या जनआंदोलनासाठी पालघर जिल्ह्यातील दोन संघटनेचे असलेले एकच मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल हे दोन वेगवेगळ्या भूमिका निभावत असल्याचे आरोप केले गेले.

एका संघटनेमार्फत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला तर राज्य पातळीवर असलेल्या मोठय़ा संघटनेमार्फत या आंदोलनाला पाठिंबा नसल्याचे त्यांनी म्हटल्यामुळे हा दुटप्पीपणा का सुरू आहे अशी टीकाटिप्पणी मच्छीमारांच्या समाजमाध्यम समूहावरून सुरू झाली व ही चर्चा टोकाला गेल्याचे दिसले. त्यामुळे मच्छीमारांमध्ये एकमेकातील वाद समोर येऊ लागले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही हे वाद विकोपाला गेल्याचे त्यांच्या समाजमाध्यम समूहावर पाहावयास मिळाले.

मासळीबाजाराबरोबरीने मच्छीमार समुदायाचे अनेक मुद्दे या निमित्ताने या समूहावर चर्चिले जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यातील फूट समोर आली. त्यातच मच्छीमार संघटनेच्या काही नेत्यांचे राजकीय धागेदोरे असल्याने संघटना म्हणून एकत्र न येता राजकीय स्वार्थामधून हा सगळा प्रकार केल्याचा संतापही येथे व्यक्त करण्यात आला. समाजमाध्यमांचा मच्छीमार समूहावर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राजकीय संघटनांमध्ये सहभागी असलेले मच्छीमार संघटनांचे काही प्रतिनिधी यांनाही चांगलेच धारेवर धरले गेले. मच्छीमार समाज हा सीमित नसून संघटनात्मक बांधणीने तयार झालेला समाज आहे. त्यामुळे राजकीय हेवेदावे असणाऱ्या प्रतिनिधींनी राजकीय सलोखे बाजूला ठेवून मच्छीमार समाज व संघटनेप्रति त्यांच्या उत्कर्षांसाठी काम करावे असे सांगण्यात आले.

‘माझ्यावरील आरोप आकसापोटी’

असा कोणताही दुटप्पीपणा मी केलेला नाही समाज संघाचे अध्यक्ष म्हणून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करणे माझे कर्तव्य आहे. वैयक्तिक आकसापोटी काहींनी माझ्यावर केलेले आरोप यामध्ये तथ्य नाही. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या सर्व वरिष्ठांशी चर्चा करूनच पाठिंब्याबाबतचे संदेश समाजमाध्यम समूहावर टाकलेले आहेत, असा खुलासा मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल यांनी या आरोप-प्रत्यारोपावर केलेला आहे.

‘मच्छीमार समाज एकवटेल असा विश्वास’

कोळीवाडे नष्ट करणे, बाजार नष्ट करणे, कोळीवाडा सीमांकन, प्रदूषण, विनाशकारी व्यापारी बंदरे अशा विविध समस्यांनी विखुरलेला मच्छीमार हा ग्रासलेला आहे व तो आता एकवटू पहातोय. पण काही राजकीय पक्षांना चिकटलेली बांडगुळे असे होऊ देत नाहीयेत. संपूर्ण मच्छीमार समाज ही धोक्याची घंटा वेळीच ओळखेल व ज्याप्रमाणे वाढवण बंदराच्या विरोधात मच्छीमार झाई ते कुलाबा असा एकवटला होता. तसाच तो येऊ घातलेल्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी एकवटेल असा विश्वास आम्हाला वाटत आहे, असे वैभव वझे यांनी या निमित्ताने म्हटले आहे.