खर्च केलेले लाखो रुपये वाया, नगरपरिषदेचे दुर्लक्ष
पालघर : पालघर नगरपरिषद हद्दीमध्ये न्यायालय रस्त्याच्या पुढे गुजरात गॅस कंपनीमार्फत गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पादचारी मार्गावर खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काढलेले पेव्हर ब्लॉक तात्पुरत्या स्वरूपाचे पुन्हा रचले जात आहेत. तकलादू काम करण्याचा प्रकार येथे होत आहे. त्यामुळे नगर परिषदेने या पादचारी मार्गासाठी खर्च केलेले लाखो रुपये वाया जात आहे, असे म्हटले जात आहेत.
कचेरी रस्ता ते न्यायालय मार्गाच्या पुढे असलेला रस्ता व रस्त्याच्या समांतर असलेला पादचारी मार्ग नगपरिषदेमार्फत अलीकडेच तयार करण्यात आला आहे. नेमका हाच पादचारी मार्ग खोदून त्या खाली गॅस वाहिनी टाकण्याचे काम कंपनीच्या एका ठेकेदारामार्फत सुरू आहे. दोन-तीन दिवसांपासून वाहिनीचे टाकण्याचे हे काम सुरू आहे.
थेट जेसीबीद्वारे खोदकाम करून त्यात वाहिनी टाकली जात आहे. पादचारी मार्ग खोदत असताना येथील गटारांचेही नुकसान होत आहे. काम झाल्यानंतर तकलादू मलमपट्टी करून पादचारी मार्ग बुजविण्याचे काम सुरू आहे. मार्ग खोदताना काढलेले पेव्हर ब्लॉक वरचेवर रचून ठेवले जात आहेत. त्यामुळे मूळ पादचारी मार्गाची वाताहत होत आहे. हे काम सुरू करताना पालघर नगर परिषदेच्या नगर अभियंता किंवा इतर विभागाचे अभियंता यांच्याशी सल्लामसलत करूनच काम सुरू करणे अपेक्षित होते. मात्र तसे येथे केल्याचे दिसून येत नाही. नगरपरिषदेचेही या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, असे सांगितले जाते. नगर परिषदेने लक्ष घालून पुन्हा चांगल्या प्रतीचा रस्ता तयार करून घेण्याची मागणी पुढे येत आहे.
संबंधित ठिकाणी नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी पाठवून पाहणी करण्यास सांगून पुढील कार्यवाही केली जाईल.
–स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद
ठेकेदार तकलादू कामे करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत आहे. काम पूर्ण केल्यानंतर मार्गाचे काम संबंधिताने पूर्ववत करावे. तसे करत नसल्याचे निदर्शनास आल्यास आम्ही नगरसेवक हे काम बंद पाडू.
– रोहिणी अशोक अंबुरे, नगरसेविका