पालघर : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे आगामी काळात त्यांची राज्यात महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पालघर जिल्हा परिषदेमधील सत्ता समीकरणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सध्या जिल्हा परिषदेतील पाच-सहा सदस्य असून ही संख्या वाढल्यास सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद गमाविण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

५७ सदस्य असणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे २० सदस्य असून काही दिवसांपूर्वी गटनेत्यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला सहा जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळी वैयक्तिक कारणे सांगून उपस्थित राहिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. एकनाथ शिंदे  मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राज्यातील परिस्थितीनुसार शिवसेनेत स्थानीय पातळीवर पडसाद उमटतील.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ सदस्य असून त्यापैकी एक गट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपाचे १२, बहुजन विकास आघाडीचे चार यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीमधील फुटीर गट एकत्र येऊन शिवसेनाविरहित जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी केलेल्या भावनिक भाषणानंतर सर्वसामान्य जनता व शिवसैनिकांमधील फुटीरवादी गटाविरुद्ध खदखद व आक्रोश वाढला आहे. आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच कम्युनिस्ट पक्ष एकत्र राहून जिल्हा परिषदेतील सत्ता राखू असे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद सदस्य यांना ऑगस्ट २०२२ मध्ये होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी व्हिप बजावण्यात आला तर राजकीय आकांक्षा असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून कोणत्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही असा विश्वास जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा यांनी व्यक्त केला आहे.