scorecardresearch

वेळेआधीच्या पावसामुळे शेतकरी धास्तावला; आर्थिक नियोजन बिघडणार असल्यामुळे चिंता

सध्या राज्यात वातावरणात बदल होत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रवादळामुळे राज्यात वेळेआधीच पाऊस धडकणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

डहाणू : सध्या राज्यात वातावरणात बदल होत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रवादळामुळे राज्यात वेळेआधीच पाऊस धडकणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आला असून अशातच पाऊस पडला तर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागेल या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती त्यांना आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा तालुक्यात शेतकरी कामामध्ये व्यग्र झाला आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी कुटुंबांनी काडीकचरा वेचून बांधावरील झाडेझुडपे साफ करणे आदी कामे सुरू आहेत. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने कामे उरकून घेण्यात येत आहेत. बांधबंदिस्त तसेच राब करणे आदी कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असून जांभूळ, आंबे या फळांचे पीकही उशिराने बाजारात दाखल होणार आहे. अशातच पाऊस सुरू झाला तर नुकसानीला सामोरे जावे लागणार असून आर्थिक नियोजन बिघडेल या चिंतेत शेतकरी आहेत.
त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा दुकानदाराकडे खरेदीसाठी लोकांनी आपल्या आर्थिक नियोजनाची व्यवस्था सुरू केली आहे. बँकेचे पीक कर्ज किंवा खासगी सावकाराकडून पैसे घेऊन आपल्या शेतीच्या बियाणे मजुरी यासाठी आर्थिक नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गुरांच्या साह्याने मिळालेले शेणखत भरून ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साह्याने शेतात टाकून हे मिश्रण करण्याच्या कामांनाही वेग आला आहे
मेमध्येच कामांना सुरुवात
साधारण जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवडय़ात शेतकरी राब करणे, मशागत करणे, बांधबंदिस्ती, लाकूड फाटा, आगोटची पूर्वतयारी करतो. मात्र यावेळी वेधशाळेने १९ मे रोजी पावसाचा अंदाज दिला आहे. त्याचा धसका घेत शेतकरी, वीटभट्टी उत्पादकही मे महिन्याच्या शेवटी अखेरची कामे सध्या करताना दिसत आहेत. बैलांच्या किमतीतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना ते परवडणारे नसल्याने शेतातील नांगरणी ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच सुरू केली आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premature rains frighten farmers anxiety poor financial planning cyclone amy

ताज्या बातम्या