लोकसत्ता वार्ताहर

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत असून, यामुळे चारोटी परिसरातील एशियन पेट्रोल पंपावर वाहनचालकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या महालक्ष्मी यात्रा उत्सवामुळे भाविकांची आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडीसह संभाव्य अपघातांचा धोका वाढत चालला आहे.

चारोटी येथील सीएनजी पंप राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यालगत आहे. या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा ही सेवा रस्त्यापर्यंत पोचते. परिणामी स्थानिक रहिवाशांसह इतर प्रवाशांना या रस्त्याचा उपयोग करता येत नाही. काही वाहन चालक तर थेट मुख्य महामार्गावर रिक्षा, कार उभ्या करत असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सीएनजीसाठी लावण्यात आलेल्या रांगा हे दृश्य नेहमीचं झालं असून, यामुळे रस्ता अडवला जातो आणि कोणत्याही क्षणी अपघात घडू शकतो. विशेषतः रात्रौच्या वेळी प्रकाशाची कमतरता असलेल्या ठिकाणी हे अधिक धोकादायक ठरू शकते. सेवा रस्त्यावरचा अडथळा दूर करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत असून “सीएनजी मिळणं गरजेचं आहे, पण त्यासाठी सेवा रस्ताच बंद होणं चुकीचं आहे. पंप मालकांनी पर्यायी व्यवस्था करावी,” अशी मागणी स्थानिक वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. काहींनी तर प्रशासनाकडेही तक्रार दाखल केली आहे.

प्रशासन आणि पंप मालकांची भूमिका अनुत्तरदायी?

महामार्गाच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीच्या सुरळीत प्रवाहासाठी पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जबाबदारी असताना, या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. पेट्रोल पंप मालकांनी विशेष गर्दीच्या काळात सीएनजी वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. सीएनजी भरण्यासाठी सेवा रस्त्यावरती उभा असलेल्या वाहनांवरती आपण कारवाई करत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्दी वाढत असतानाच सीएनजीची उपलब्धता कमी होणं, हे वाहनचालकांसाठी दुहेरी संकट ठरत आहे. एकीकडे प्रवासात विलंब होतो आहे, तर दुसरीकडे अपघाताचा धोका वाढतो आहे. प्रशासन, पंप मालक आणि स्थानिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.