तालुक्याच्या ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या भाताचे नुकसान

पालघर/वाडा : अरबी सागरात व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पालघर जिल्ह्य़ात आज अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे कापणी करून ठेवलेल्या भातासह इतर व्यवसायांवर परिणाम झाला.

जिल्ह्य़ातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, पालघर, बोईसर, वाडा, डहाणू व तलासरी व इतर भागांत अनेक ठिकाणी काही वेळ पाऊस पडल्याची माहिती देण्यात येते. कापणी करून ठेवलेले भात शेतामध्ये असल्याने तसेच काही ठिकाणी झोडणी सुरू असल्याने भातपिकाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी ताडपत्री, प्लास्टीकच्या मदतीने भाताचे भारे झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र वारा पाऊस असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. यामुळे भात भिजून नुकसान झाले. या खेरीज वीटभट्टी, मिठागर व गवत संकलन केंद्रांवर गवताचा मोठा साठा असल्याने या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले. विक्रमगड तालुक्यातील मौजे कुंझ्रे परिसरात एक तास कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले.