कासा : जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत स्कॉलर फाऊंडेशन पाचगणी येथे शिक्षण घेणाऱ्या अडीचशे विदयार्थ्यांना केवळ दोन बसमध्ये कोंबून नेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी हाणून पाडला. सुमारे साडेतीनशे ते चारशे किलोमीटर अंतरासाठी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना कोंबून नेणाऱ्या फाऊंडेशनवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी स्थापलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील अडीचशे विद्यार्थी स्कॉलर फाऊंडेशन पाचगणी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी बसची सोय करण्यात आली, परंतु साडेतीनशे ते चारशे किलोमीटरचे हे अंतर जाण्यासाठी या अडीचशे विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन बसचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे मुलांना अतिशय दाटीवाटीत कोंबून बसावे लागत होते. ही बाब लक्षात येताच पालघर जिल्हापरिषद सदस्य प्रकाश निकम, सारिका निकम आणि कार्यकर्त्यांनी या बस रोखल्या आणि प्रशासनाकडे अतिरिक्त बसची मागणी केली. प्रशासनाने बसची मागणी पूर्ण करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून प्रचंड शुल्क घेऊनही स्कॉलर फाऊंडेशन अशाप्रकारे विद्यार्थ्यांची गैरसोय करत असल्याने शाळेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
