पावसामुळे बाजारपेठेत खरेदीवर परिणाम

पालघर : पालघर जिल्हा हा टाळेबंदी उठवण्याच्या नियमावलीमध्ये तिसऱ्या स्तरावर वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार सायंकाळी चार वाजेपर्यंत बाजारपेठ दुकाने व इतर आस्थापने खुली ठेवण्याची मुभा सोमवारपासून देण्यात आली आहे.  आज पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने त्याचा बाजारातील खरेदीवर परिणाम झाला.

करोना टाळेबंदी संदर्भातील निर्बंध शिथिल करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले असून आजपासून या नियमावलीची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली.  पालघर जिल्ह्याचे या आठवड्यातील स्थान तिसऱ्या गटामध्ये निश्चित करण्यात आला असून जीम, सलून, ब्युटीपार्लर हे सोमवार ते रविवार सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने उघडी राहणार आहेत.

त्याच पद्धतीने उपाहारगृहे, हॉटेल ५० टक्के उपस्थितीत सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू  ठेवण्याची मुभा असून त्यांना रात्री पार्सल सेवा देण्याची मुभा कायम राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक १०० टक्के आसन क्षमतेने कार्यरत ठेवण्याची मुभा असून त्यामध्ये उभ्याने प्रवास करण्यावरही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. औद्योगिक कारखान्यांमध्ये पन्नास टक्के कर्मचारी संख्येची उपस्थिती व इतर निर्बंधावर उद्योग सुरू  करण्याची मुभा देण्यात आली आहे. दीड महिन्यानंतर  शिथिलता खंडित झाल्यानंतर सोमवारी बाजारामध्ये गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सकाळपासून जोरदार पावसाने अनेक भागांमध्ये हजेरी लावल्याने त्याचा परिणाम बाजारात येणाऱ्या नागरिकांवर झाला.  मात्र  टारपोलीन, प्लास्टिक कपडा, रेनकोट, छत्र्या व इतर पावसाळी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली झाल्याचे दिसून आले.  भाजीपाला, फळविक्री करणारे विक्रेते व हातगाड्यांवरील वस्तू विक्रेत्यांकडे फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.