|| नितीन बोंबाडे

आसनगाव येथील खाजण क्षेत्रात भराव; १०० हेक्टर भातशेती नापीक होण्याची भीती

डहाणू: वाणगाव नजीकच्या आसनगाव येथील खार भूमीत बनवलेल्या रस्त्यामुळे परिसरातील भातशेती पुरामध्ये पाण्याखाली येत असल्याने तब्बल १०० हेक्टर भातशेती नापीक होऊ लागल्याने सुपीक शेतीवर पाणी सोडावे लागले आहे. आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे, पळे भागातील तब्बल १०० हेक्टर भातशेती नापीक बनल्याने शेतकरी शेतीहिन बनला आहे. तर खाजण क्षेत्रातील अतिक्रमणे दूर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

वाणगाव नजीकच्या आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे, पळे या खाजण जमिनीत अनधिकृत भराव झाल्यामुळे  नैसर्गिकरीत्या पाणी परतण्यास मज्जाव होऊन पूर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. सन १९९९ मध्ये थर्मल पॉवर प्रकल्पाची राख वाहून नेण्यासाठी खारभूमीत ५ ते १० मीटर दगड मातीचा भराव करून नैसर्गिकरीत्या पाणी पसरण्यात अडथळा निर्माण होऊन पावसाचे पाणी अडवले जाऊन पाणी गावाच्या दिशेने पसरू लागले. तर भातशेतीत खारे पाणी साचून भातशेती नापीक बनली आहे. त्यामुळे  शेतात खारे पाणी घुसून १०० हेक्टर सुपीक भात शेतीचे नुकसान झाले आहे.

आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे परिसरात ३०० एकर क्षेत्रात शेतकरी भातशेती करून उदरनिर्वाह करीत होते. त्यापैकी १०० हेक्टर भातशेतीवर पाणी सोडावे लागले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय न झाल्यास उर्वरीत शेती बागायती क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

पावसाचे पाणी अडकून आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे, पळे, तलाईपाडा, कासपाडा, स्टेशन पाडा, अत्री अपार्टमेट, दुबलपाडा या भागाला काही वर्षांपासून पुराचा सामना करावा लागत आहे. तरी पाण्याच्या प्रवाहाचे  कृत्रिम अडथळे दूर करण्यासाठी थर्मल पावरकडे जाणाऱ्या रस्त्यावर झडपा तसेच पाणी वाहून जाण्यासाठी पूल बांधण्याची मागणी निवृत कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी केली आहे. याबाबत महसूल अधिकाऱ्यांना विचारले असता खारभूमी विकास महामंडळाने कारवाई करण्यात यावी असे उत्तर दिले जाते.

आसनगाव, कापशी, डेहणे, पळे, या भागातील शेतजमिनी नापीक बनल्याने शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन निघून गेले आहे. खाजन जागेत माती भराव करण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा बनून पाणी साचत आहे. – कॅप्टन सत्यम ठाकूर, वाणगाव

 

डहाणू, वाणगाव  परिसरातील खाजण जागेत शर्तभंग केलेल्या कोळंबी प्रकल्पाविरुद्ध प्रांताधिकारी यांनी कारवाई केली आहे. असे प्रकार आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. – राहूल सारंग, तहसीलदार, डहाणू