scorecardresearch

विकासकांच्या फायद्यासाठी रस्ता?

तलासरी नगरपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतील २९ लाख खर्चून प्रशस्त रस्ता बांधला आहे.

तलासरी नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कासा : तलासरी नगरपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतील २९ लाख खर्चून प्रशस्त रस्ता बांधला आहे. त्यावरुन नगरसेवक तसेच ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे. तलासरी नगरपंचायतीच्या हद्दीत तलासरी सुतारपाडा मोहितेवाडी येथे बिगर शेती क्षेत्राचा विकास होत आहे. विकासकाने खरे तर स्वत: या भागातील रस्ते आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची सोय करणे गरजेचे होते. परंतु येथील विकासकाने ही कामे न करताच प्लॉटची विक्री केली आहे.  याच विकासकांच्या फायद्यासाठी तलासरी नगरपंचायतीने २९ लाखाचा प्रशस्त रस्ता बनवला, असा आरोप केला जात आहे. आदिवासी पाडय़ांत जाण्यासाठी ३ मीटरचा रस्ता तयार होत नाही, परंतु येथे मात्र ६मीटरचा रस्ता केवळ विकासकांच्या फायद्यासाठी बनवण्यात आला आहे, तसेच या बिगर शेती क्षेत्रात रस्ता बनवून  शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचेही म्हटले जात आहे.

तलासरी नगर पंचायत हद्दीतील   रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. नगरपंचायतीकडे स्वत:चा अभियंता नाही त्यामुळे डहाणू नगर पंचायतीचे अभियंता गणेश बरगळ यांच्याकडे बांधकामाचा ताबा आहे. परंतु ते तलासरीत आठवडय़ातून फक्त एकदा शुक्रवारी येतात. त्यांच्या अनुपस्थितीत ठेकेदार मनमानी पद्धतीने कामे करतात.  त्यामुळे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनीच यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

मार्चअखेरीस लवकरात लवकर बिले काढण्यासाठी नगरपंचायत आणि ठेकेदार घाई करत असल्याचा आरोप  राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणपत वागलोढा यांनी केला आहे.    शिवसेनेचे नगरसेवक आशीर्वाद रिंजड, यांनी निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तलासरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये यांनी हा रस्ता आदिवासी पाडय़ात जात असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road benefit developers question marks management ysh

ताज्या बातम्या