भोजन नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल
कासा : पालघर जिल्ह्यातील पहिलीपासून सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी काही वर्ग सकाळ सत्रात तर काही वर्ग दुपार सत्रात भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे असताना जव्हार तालुक्यात मात्र सरसकट पूर्ण दिवस शाळा भरवण्यात येत असल्याने पालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पालघर जिल्हा हा दुर्गम आदिवासी भाग असलेला जिल्हा आहे. शाळेपासून विद्यार्थ्यांचे घराचे अंतर प्राथमिक वर्गासाठी काही ठिकाणी दोन किलोमीटपर्यंत आहे, तर उच्च प्राथमिक शाळा घरापासून तीन ते चार किलोमीटपर्यंतच्या अंतरावर आहेत. सकाळी जेवण करून मुले शाळेत येतात. दिवसभर शाळा असल्यामुळे तसेच शाळेत दुपारच्या जेवणाची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशीच राहावे लागत आहे.
इतर तालुक्यात अर्धा दिवस शाळा भरवली जात आहे, परंतु फक्त जव्हार तालुक्यात पूर्ण दिवस शाळा भरवून विद्यार्थ्यांना उपाशी ठेवले जात आहे याकडे पालक सुनील भोये यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांना विचारले असता संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अर्धा दिवस शाळा भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदिवासी दुर्गम भागाचा विचार करता व शाळेमध्ये दुपारचे जेवण देता येत नसल्याने अर्धा दिवस शाळा भरवण्याचे सांगण्यात आले आहे. ज्या शाळांचा पट जास्त आहे, अशा शाळांना दोन सत्रात शाळा भरवण्यास सांगण्यात आले आहे. जर जव्हारमध्ये असा प्रकार होत असेल तर संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
‘दुपारचे भोजनही द्यावे’
करोनामुळे शाळांमध्ये मध्यान् भोजन योजना बंद आहे. आदिवासी दुर्गम भागाचा विचार करता व शाळेत मध्यान भोजन योजना सुरू नसल्यामुळे अर्धा दिवस विद्यार्थी उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर शाळा दिवसभर भरवणार असतील तर शाळेमध्ये दुपारचे जेवण दिले जावे, अन्यथा इतर तालुक्यातील शाळांप्रमाणे जव्हार तालुक्यातही अर्धाच दिवस शाळा भरवण्यात याव्यात, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.