ग्रामीणभागातील विद्यार्थी शेती, रानभाज्यांच्या विक्रीकामात व्यग्र

डहाणू : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आभासी शाळा सुरू असताना दुर्गम भागात उच्च क्षमतेचे मोबाइल (अँड्रॉइड) नसलेल्या विद्यार्थी भातलावणी तसेच रानभाज्यांच्या विक्रीकडे वळाले आहेत. यातून मिळणाऱ्या पैशावर आपल्या पालकांना घरखर्चासाठी हातभार लावताना दिसत आहेत. डहाणू, तलासरी, पालघर, विक्रमगड, जव्हार भागांतील विद्यार्थ्यांनी टाळेबंदीमध्ये अर्थार्जनासाठी भातलावणी, कंपनीमध्ये काम करण्याकडे वळल्याचे दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर प्रत्यक्ष शाळेचे वर्ग सुरू करण्याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहेत.

टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांच्या शाळा लांबल्या आहेत. अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहेत. परंतु पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी कुटुंबाकडे ना उच्चक्षमतेचे मोबाइल व दूरचित्रसंच. अनेक भागांत नेटवर्कही नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा गोंधळ आहे. मनोर- जव्हार राज्यमार्ग, डहाणू-नाशिक राज्यमार्ग, टेण -वाडा राज्यमार्ग, विक्रमगड- जव्हार महामार्ग,  कोसबाड, भोपोली तसेच ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बसून विक्री करत असलेल्या लहान मुलांच्या रानभाज्यांच्या टोपऱ्या खवय्यांना खुणावत असतात. पळसाच्या पानात कोळी भाजी, करडू, बांबू भाजी, शीन, करटोळीचे वाटे मांडून विक्री करतात. हे विद्यार्थी पावसाळ्यातच उगवणाऱ्या या भाज्यांची विक्री करताना दिसतात. शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शेतीच्या कामात पुढाकार घेऊन शेतीचे धडे गिरवले. अनेकांनी नांगर चालवण्यापासून शेतीमध्ये बांध घालणे, चर खोदणे, भार खणणे, आवणे आदी कामात झोकून दिले आहे.