पालघर जिल्ह्य़ातील ३५५ कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत निलंबन

पालघर: पालघर जिल्ह्य़ातील सफाळे व वसई या दोन आगारांतील राज्य परिवहन सेवेतील बस गाडय़ा अंशत: सुरू झाल्या आहेत. राज्य परिवहन मंडळाने संपात सहभागी पालघर जिल्ह्यतील ३५५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.  

राज्य परिवहन मंडळाच्या विभागात २२७३ कर्मचारी कामावर असून त्यापैकी ४३८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामध्ये २५१ कार्यशाळेतील कर्मचारी व ११३ प्रशासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. कामावर रुजू न होणाऱ्या २५९ कामगारांनी विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित झालेल्यामध्ये ७७ चालक, ७० वाहक, ४० चालक-वाहक, ४० कार्यशाळेतील कर्मचारी व ३२ प्रशासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शुक्रवारपासून काही आगारांमध्ये अंशत: एसटी सेवा सुरू करण्यात आली. पालघर विभागात २५ नोव्हेंबर रोजी ४४ फेऱ्या (७२१ किलोमीटर), २६ नोव्हेंबर रोजी १३८ फेऱ्या (२७५८ किलोमीटर), २७ नोव्हेंबर रोजी १७८ फेऱ्या (३८३६ किलोमीटर) तर २८ नोव्हेंबर रोजी १२८ फेऱ्या (३००९ किलोमीटर) राज्य परिवहन सेवा कार्यरत राहिल्या. पालघर तालुक्यातील सफाळे आगर जवळपास पूर्ण क्षमतेने कार्यरत असून वसई आगार २५ ते ३० टक्के कार्यरत असल्याची राज्य परिवहन मंडळाकडून माहिती देण्यात आली.

दररोज ४५ लाखांचे नुकसान

राज्य परिवहन सेवा बंद असल्याने पालघर विभागाचे दररोज किमान ४५ लाख रुपयांचे नुकसान होत असून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यावर येत्या काही दिवसांत नव्याने निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य परिवहन मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या बरोबरीने बंद कालावधीत रोजंदारीवर असणाऱ्या ९१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.