पालघर जिल्ह्य़ातील शाळा, मंडळे यांना प्रतिष्ठानकडून इतिहास मार्गदर्शन

पालघर : पालघर तालुक्यातील ऐतिहासिक वनदुर्ग यादीत सफाळे परिसरातील तांदुळवाडी गडास विशेष स्थान असून सूर्या व्हॅली विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तांदुळवाडी दुर्ग अभ्यास व इतिहास मार्गदर्शन भटकंतीचे नुकतेच रविवारी आयोजन करण्यात आले होते.

६० शालेय विद्यार्थी, अभ्यासक, दुर्गमित्र, शिक्षक यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला. या मोहिमेच्या सुरुवातीला युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे अध्यक्ष प्रशांत सातवी यांनी तांदुळवाडी गडाच्या मोहिमेची, गड चढाई करताना आवश्यक गोष्टी, दुर्गसंवर्धन आवश्यकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेच्या मुख्य शिक्षिका पालवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना इतिहास सफरीचे महत्त्व सांगितले. युवा शक्ती प्रतिष्ठान दुर्गमित्र प्रतिनिधी जयेश पाटील यांनी सदर मोहिमेचे नेतृत्व केले.

या मोहिमेत विद्यार्थ्यांना इतिहास व वास्तुविशेष मार्गदर्शन करण्यासाठी किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक व प्रमुख श्रीदत्त राऊत उपस्थित होते. मोहिमेच्या समग्र भटकंतीत त्यांनी सात आसरा स्थान, टाकी, बालेकिल्ला, हजेरी माळ, श्री वज्रेश्वरी देवी स्थान, तटबंदी, पाहिली, वैतरणा नदी, पौराणिक संदर्भ, मुख्य प्रवेशद्वार बुरुज, इतर वाटा इत्यादी विषयावर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोहिमेत सक्रिय सहभागी होत मुक्त अभ्यास भटकंतीचा आनंद घेतला.

युवा शक्ती प्रतिष्ठानचे दुर्गमित्र प्रतिनिधी जयेश पाटील यांनी ‘श्री शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी सोहळा समिती’ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध शाळा, मंडळे यांना सातत्याने इतिहास भटकंती व दुर्गसंवर्धन यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर राहणार आहोत, असे सांगितले.