नितीन बोंबाडे
डहाणू : मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्हयात उत्पादित होत असलेल्या आरोग्यदायी ताडीला मोठय़ा प्रमाणात मागणी होत आहे. डहाणू, तलासरी, पालघर, विक्रमगड तालुक्यांत खजुरी, ताड, माड, तसेच नारळाच्या झाडापासून काढण्यात आलेली ताडी ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा बनली आहे. डहाणू तालुक्यातील कोसबाड या ठिकाणी निरा उत्पादनातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असून जिल्ह्यातील हजारो जणांना ताडीच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
डहाणू, तलासरी या तालुक्यांत शेतीपूरक व्यवसाय म्हणून सर्वात जास्त खजुरीच्या झाडापासून ताडी काढली जाते. डहाणूमध्ये करजगाव, वंकास, गांगणगाव, नागझरी, धुंदलवाडी, अंबोली, धानीवरी, गंजाड, तलासरी तालुक्यांत काजळी, उपलाट, सुत्रकार, वरवाडा, तर डहाणूमध्ये चारोटी, घोळ, वेती, वरोती, रानशेत, जामशेत, आंबेसरी, आशागड, गांजाड तसेच इतर भागांत माडाची ताडीची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. साधारण नोव्हेंबर ते जूनपर्यंत आठ महीने चालणाऱ्या ताडी व्यवसायावर हजारो कुटुंब चालतात. ताडी दुकानांचा लिलाव पद्धतीने परवाने देऊन ताडी व्यवसाय चालतो. ताडी हे आदिवासींच्या जीवनशैलीत सर्वात आवडते पेय आहे. सकाळी ताजी ताडी गुणकारी औषध म्हणून ओळखले जाते. त्याच्या वापरामुळे ओटीपोटातले आजार दूर होतात. मूत्रिपडाच्या आजारांमध्येही ती फायदेशीर ठरते, असे म्हटले जाते.
‘निरा’ची प्रक्रिया
ताड तसेच शिंदीच्या झाडावरील खोडास विशिष्ट खोलीवर खाच पाडून त्यातून निघणारा रस म्हणजे निरा होय. निरा काढण्याची प्रक्रिया म्हणजे ही ताडी सकाळी सूर्योदयाच्या आधीच काढली जाते. त्यासाठी वापरली जाणारी मटकी रोजच्या रोज पाण्याने स्वच्छ केली जातात. त्यामुळे या ताडीत जराही आंबटपणा नसतो. एकदम साखरेच्या पाण्यासारखी गोड असते. त्याच ताडीला निरा असे म्हणतात. नंतर त्यावर योग्य प्रक्रिया करून विक्रीसाठी मुंबई व इतर भागांत पाठवली जाते.
ताडी काढण्याची पारंपरिक पद्धत
खजुरी या झाडाला काही भागात शिंदीचे झाड असेही म्हणतात. पावसाळा संपला की शिंदी किंवा आपल्या स्थानिक भाषेत खजुरीचा बुंध्याकडील भाग धारधार कुऱ्हाडीने साफ करण्यास सुरुवात केली जाते त्याला शेलवणीह्ण म्हणतात. शेलवणी दोन वेळेस करतात. त्यानंतर विशिष्ट प्रकारची खोच पाडून खालच्या बाजूस मडके लावून रस गोळा करतात. खजुरीला जी भोके पाडली जातात त्याला शेव असे म्हणतांत. काही वेळा हा शेव एकाच बाजूने असतो. त्यामुळे त्याला एकनाकी शेव असे म्हणतात. ताडी गळायला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे आठवडाभर झाडाना आराम दिला जातो. याला डालनी दिली असे म्हणतांत. एक खजुरी चार ते पाच दिवस ताडी देते मग ढालनी देतात. मग शेव करुन परत सुरू करतात. डालनीनंतर जी ताडी काढली जाते त्याला बांधणीची ताडी असे म्हणतात.
माडाची ताडी : खजुरीप्रमाणे माडाचीदेखील ताडी प्रसिद्ध आहे. माडाचेदेखील दोन प्रकार आहेत, एक म्हणजे माड आणि दुसरा म्हणजे तली यामध्ये माडाला माड (ताडगोळे) लागतात तर तलीला माड (ताडगोळे) लागत नाही. माडाची ताडी ज्यापासून काढली जाते त्याला कोचा असे म्हणतात तर तलीची ताडी तिच्या शेंगांपासून काढली जाते. शेव केल्यानंतर कोचा व शेंगा कापून त्यातून ताडी काढली जाते. तलीची ताडी काहीशी कडवट पण आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी समजली जाते. चांगली ताडी येण्यासाठी दिवसातून सलग तीन वेळा शेव करणे आवश्यक असते. समुद्र किनाऱ्यावर नारळाच्या झाडापासूनदेखील ताडी काढली जाते.
ताडी विक्रीसाठी शासन लिलाव पद्धतीने ताडी दुकाने देते. लिलाव शक्य नसेल तेव्हा आधीच्या वर्षीच्या परवान्याचे नूतनीकरण करते. आदिवासी भागात टीआरटीपीनुसार दुकाने दिली जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने ताडी विक्रीला परवानगी दिली आहे. बेकायदा ताडी विक्री वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे.-विजय भुकन, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग
ग्रामीण भागांत शेतीबरोबर ताडीचाही व्यवसाय केला जातो. त्यामुळे आदिवासी लोकांना यातून दोन पैसे मिळतात व त्यांची गुजराण होण्यास मदत होते. त्यामुळे तरुण वर्ग ताडी व्यवसायाकडे वळू पाहत आहे.-चंद्रकांत घाटाळ, कासा

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
Loss of crops on three and a half thousand hectares due to unseasonal rain
बुलढाणा : ‘अवकाळी’चा शंभर गावांना फटका, साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी; ३०९ घरांची पडझड