मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी पोलिसांनी शुक्रवार, २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा सदृश्य पदार्थ जप्त केला आहे. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने सुरू असलेली ही अवैध तस्करी उधळल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पालघर पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दापचरी तपासणी नाक्यावर पोलिसांनी आज दुपारपासून सापळा रचला होता. संशयास्पद वाटणाऱ्या दोन मोठ्या कंटेनरची कसून तपासणी केली असता, त्यात लपवलेला गुटखा सदृश्य पदार्थांचा प्रचंड साठा आढळून आला. पोलिसांनी कंटेनरसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तलासरी पोलिसांनी दिली.
महाराष्ट्रामध्ये गुटखा आणि तत्सम पदार्थांच्या विक्री आणि सेवनावर पूर्णपणे बंदी असली तरी, गुजरात राज्यातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी सुरूच आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा अनेक वर्षांपासून अशा तस्करांसाठी एक मार्ग बनला आहे. या मार्गावरून कोट्यवधी रुपयांचा गुटखा सदृश्य पदार्थ राज्याच्या विविध भागांमध्ये पोहोचवला जातो. मात्र, पालघर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून या तस्करीवर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष निर्देशामुळे जिल्ह्यातून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर अंकुश मिळवण्यात पोलिसांना यश येत आहे, ज्यामुळे तस्करांची धांदल उडाली आहे. ही कारवाई अशा माफियांचे कंबरडे मोडणारी असून, यातून आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.