नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

निखील मेस्त्री

पालघर : बोईसर- तारापूर औद्योगिक  वसाहतीत असलेल्या कारखान्यांकडून वायूप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे वसाहत आणि परिसरातील गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच औद्योगिक विकास महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये लघू, मध्यम व मोठे उद्योग दिवसरात्र सुरू असतात.  उत्पादन प्रक्रिया सुरू  असताना यातील काही कारखान्यांमधून विषारी वायू सोडले जातात. ते हवेत पसरल्यामुळे हवा प्रदूषित होत आहे.  तारापूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात सालवड, कुंभवली, पास्थळ, पाम, सरावली कोलवडे अशी अनेक गावे आहेत.  प्रदूषणाचा त्रास या  गावांना होत असतो.  प्रदूषणामुळे गावातील झाडे, झुडपे, भाजीपाला बागायती यावर विपरीत परिणाम होत आहे. त्वचारोग, श्वसन, फुप्फुस, डोळ्यांचे आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे कर्करोगासारखा भयंकर आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. अलीकडेच या प्रदूषित वायूमुळे कोलवडे गावात चक्कर येणे, मळमळणे डोळे चुरचुरणे अशा त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागले होते.  त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती.

या प्रदूषणाबाबत अनेकवेळा या गावांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली आहे. मात्र प्रदूषण मंडळाने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत.  प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक  प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण यंत्रणा केवळ नावासाठी लावली आहे. याचा कोणताही उपयोग होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. याबाबत पर्यावरण दक्षता मंचचे अध्यक्ष मनीष संखे यांनी  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भविष्यात कर्करोगासारख्या भीषण आजार बळावले व त्यामध्ये मृत्यू झाले तर  याला जबाबदार कोण? असा प्रश्न संखे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत व उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गस्ती पथक नेमण्याची मागणी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक वायू सोडणाऱ्या कारखान्यांमध्ये  प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी  अद्ययावत यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.  यंत्रणेतून दररोज मिळालेली माहिती  जनहितार्थ जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र  त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा कारखान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी  गस्ती पथक स्थापन केल्यास  वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.