वाडा: वाडा तालुक्यातील चांबळे व विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली येथे रब्बी हंगामात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळय़ांत कांद्याने पाणी आणले आहे. कांदा लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत अनंत अडचणी आल्याने उत्पादनात घट झाली आहेच, शिवाय कांद्याचे भावही घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
वाडा तालुक्यातील मौजे चांबळे येथील ६०हून अधिक शेतकरी जवळपास ८५ एकरांवर दरवर्षी पांढऱ्या कांद्याचं उत्पादन घेतात. संपूर्ण गावातून साधारण तीनशे ते साडेतीनशे टनांपर्यंत कांद्याचे उत्पादन होते. त्याचप्रमाणे विक्रमगड तालुक्यातील मौजे म्हसरोली येथीलही ७०हून अधिक शेतकरी दरवर्षी ८५ ते ९०एकरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. या कांद्याच्या दोन-पाच किलो वजनाच्या माळा तयार करून त्या ठाणे, पालघर जिल्ह्यातील शहरी भागांत आणि आठवडा बाजारात विक्री केल्या जातात.
यंदा मात्र डिसेंबरपासून अर्थात लागवडीच्या हंगामापासूनच अवकाळी पाऊस, खराब हवामान या नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी हिंमत ठेवून पीक काढले, पण आता पांढऱ्या कांद्याचा दर एकदम घसरल्याने उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही, अशा विवंचनेत कांदा उत्पादक शेतकरी सापडले आहेत. या कांद्याच्या खरेदीसाठी मुंबई, वसई, बोईसर येथून येणारे व्यापारी कांद्याला उत्पादन खर्चाइतकाही दर द्यायला तयार नाहीत. तर शेतकरी जास्त दिवस कांद्याचा साठाही करू शकत नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे.
पांढऱ्या कांद्याचे आर्थिक गणित
प्रति एकरी सरासरी ५० ते ५५ टन कांद्याचे उत्पादन येते. त्यासाठी ३०-४० हजारांचा खर्च येतो, परंतु व्यापारी या कांद्याला ८-१०हजार रुपये प्रति टन इतकाही दर द्यायलला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.