पालघर : पालघर नगर परिषदेमार्फत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे समोर आले आहे. दर्जा न तपासता थेट हे काम सुरू आहे. नगर परिषद हद्दीतील बाळासाहेब ठाकरे उद्यानाशेजारी या गटाराचे काम सुरू असून याकडे नगर परिषदेचा एकही अभियंता अजूनपर्यंत फिरकलेला नाही.
पालघर नगर परिषद हद्दीमध्ये आर्यन शाळा रस्त्याच्या बाजूला नवीन गटाराचे काम नगर परिषदेमार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरू झाल्यानंतर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामासाठी वापरलेले साहित्य उत्तम दर्जाचे नसल्याचे दिसून येत आहे. याचबरोबरीने अंदाज पत्रकाप्रमाणे कोणतेही काम येथे सुरू असल्याचे दिसून येत नाही. याउलट सरसकट लोखंडी सळ्यांची बांधणी करून त्यात काँक्रीट टाकले जात आहे.
गटाराच्या भिंती बांधताना भिंती उभारण्यासाठी ठेवलेले साहित्य अवघ्या दोन दिवसांत काढल्यामुळे भिंतीच्या मजबुतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे काम सुरू असताना नगर परिषदेचे अभियंते या ठिकाणी फिरकलेले नाहीत. वापरण्यात येत असलेले काँक्रीट उत्कृष्ट दर्जाचे असेल का याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रभागात असलेले नगरसेवकही या कामाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. दर्जाहीन काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्याधिकारी यांनी या बाबींकडे लक्ष दिले जाईल अशी प्रतिक्रिया दिली. तर नगराध्यक्ष यांनीही अभियंत्यांना पाठवून कामाची तपासणी केली जाईल, असे सांगितले.