बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या बंद अवस्थेत आहेत. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे येथे दिवसाढवळय़ा चोरीचे प्रकार होत आहेत. शनिवारी अशाच एका कंपनीत चोरी करताना स्फोट झाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. चोरी प्रकरणात कंपनीचे नुकसान तर होतच असून चोरी करताना घडलेल्या दुर्घटनेत माणसाच्या जिवालाहा धोका निर्माण झाला आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये  सुमारे १५०० कंपन्या आहेत. त्यातील ५० ते १०० मोठय़ा कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. परंतु यातील कंपन्यांची मालमत्तेची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे या कंपन्यातून यंत्रे, भंगार वस्तू चोरीला जात आहेत.  याबाबत तक्रार येत नसल्यामुळे कारवाई करता येत नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक एन २२ मधील साबणाचे उत्पादन घेणारी ओरा ऑइल कंपनी ही ऑक्टोबर २०१६ पासून बंद आहे. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास कंपनीमधील यंत्रसामग्रीची गॅस कटरच्या साहाय्याने चोरीछुपे कटिंग सुरू होती. ही माहिती परिसरात राहणारे कंपनीचे कामगार गणपत पाटील यांना मिळाली होती. ते कंपनीत गेले असता कंपनीच्या आवारात सहा व्यक्ती आढळून आले. दोघेजण जेसीबी मशीन आणि क्रेनसोबत उभे होते, तर अन्य चार जण गॅस कटरच्या साहाय्याने यंत्र सामग्रीचे कटिंगचे काम करीत होते. याबाबत त्यांना पाटील यांनी विचारले असता कंपनी बँकेने विक्री केली असल्याचे सांगितले आणि आम्हाला  कंपनीमधील भंगार नेण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. कामगारांची देणी थकलेली असताना परस्पर कंपनीची विक्री होऊ शकत नाही, हे माहिती असल्यामुळे सदर प्रकार हा चोरीचा असल्याचा संशय पाटील यांना आला. त्यांनी ही माहिती त्यांच्या सोबत काम करणारे कंपनीचे सुपरवायझर  लालचंद आणि राधेश्याम यांना दिली. दोघांनी घटनास्थळी पोहचून पोलिसांना दूरध्वनी केला. दरम्यानच्या काळात एल.डी. ओ.च्या टाकीचे कटिंग सुरू असताना स्फोट झाला आणि कंपनीत आग लागली. त्यात एक जण जखमी झाला. इतर जेसीबी मशीन आणि क्रेन घेऊन पळून गेले.   या प्रकरणातील सहा जणांतील  सागर संखे, निलीम ऊर्फ बंडय़ा, भूपेश या व्यक्ती कामगारांच्या ओळखीच्या असून बोईसर एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात आगीच्या घटनेची नोंद केली आहे. तीन जणांना क्रेनसह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला  असल्याची माहिती बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.  .

पोलिसांचा वरदहस्त?

बोईसर पोलीस ठाण्याच्या तसेच औद्योगिक वसाहत सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिवाळीनंतर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन दिवसांतच चोरीचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांत पोलिसांचा वरदहस्त असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्याकंपनीतील ४५ कामगारांचे वेतन थकीत

सहा वर्षांपासून ४५ कामगारांच्या थकीत वेतनाची रक्कम मिळावी यासाठी लढाई  सुरू आहे. मालकाने कामगारांच्या ४० महिन्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कमही भरलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाढवळय़ा कंपनीतील यंत्रसामग्री व इतर लोखंडी भंगार वस्तुंची चोरी होत आहे. आमच्या हक्काच्या पैशांसाठी आमचा लढा सुरू असून कंपनीतील भंगाराची चोरी करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कंपनीचे कामगार गणपत पाटील यांनी केली आहे.

तक्रारी करूनही कारवाई नाही

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कंपन्यांमधील भंगार यंत्रसामग्रीची चोरी आणि अवैधरीत्या घातक रसायन मुरबे खाडी तसेच शेतजमिनीमध्ये सोडले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्यानंतरही याबाबत कारवाई होत नाही. चोऱ्यांमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय भंगार माफियांची टोळी कार्यरत आहे. कालच्या स्फोटामुळे चोरीची घटना उघडकीस आली आहे, असे पर्यावरण उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष रुपेश संखे यांनी सांगितले.