जामशेतमधील प्रकार; शेकडो झाडांचीही कत्तल
कासा : जामशेत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वसंतपाडा भागातून गेल्या महिनाभरापासून मोठय़ा प्रमाणात कोटय़वधी रुपयांच्या गौण खनिजांची चोरी होत आहे. त्याचप्रमाणे शेकडो झाडांचीदेखील कत्तल केली जात असून त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. याकडे महसूल विभाग तसेच वन विभाग अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. सद्य:स्थितीत पालघर जिल्ह्यामधून बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग, रेल्वेचा मालवाहतूक मार्ग अशा तीन मोठय़ा प्रकल्पांचे काम सुरू आहे. भराव टाकण्यासाठी मोठय़ा प्रमाणात माती, मुरूम अशा गौण खनिजांची आवश्यकता लागते. त्यासाठी परिसरातील जामशेत ग्रामपंचायत हद्दीतील वसंतपाडा भागातून उत्खनन करून मोठय़ा प्रमाणात गौण खनिजांची चोरी केली जात आहे.
गेल्या महिनाभरापासून या भागात हजारो ब्रास माती, मुरूम अशा गौण खनिजांची वाहतूक सुरू आहे. गौण खनिजांचे उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाकडून स्वामित्वधन (रॉयल्टी) भरून परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबत वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराकडे चौकशी केली असता त्यांनी स्वामित्वधन भरले असल्याचे सांगितले, परंतु त्याबाबतचे परवानगीची कागदपत्रे दाखवता आली नाहीत. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परवानगी घेतली असली तरी परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. उत्खनन करताना साग, सिसम अशा बहुमूल्य शेकडो झाडांची वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचाही आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
आमच्या भागातून गेल्या महिन्याभरापासून अनधिकृतपणे उत्खनन करून कोटय़वधी रुपयांच्या माती, मुरूम अशा गौण खनिजांची चोरी केली जात आहे. याबाबत आम्ही तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली असून अजूनही त्यावर काहीही कारवाई केलेली नाही.
-वसंत गोरवला, पंचायत समिती सदस्य
जामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये होणाऱ्या उत्खननासाठी संबंधित ठेकरदाराने स्वामित्वधन भरून आवश्यक ती परवानगी घेतलेली आहे. तरीसुद्धा सदर ठिकाणच्या उत्खननाची पाहणी करून परवानगीपेक्षा जास्त खोदकाम केले असल्यास तसेच वृक्षतोड झाली असल्यास ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-असिमा मित्तल, प्रांत अधिकारी, डहाणू.