पालघर: निसर्गरम्य व पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केळवे गावातील वडाळा तलावात हजारोच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकारांमध्ये घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. केळवे गावात अनेक तलाव असून तलावातील स्वच्छता व पाण्याची पातळी राखून ठेवण्यासाठी टेंडर पद्धतीने हे तलाव मत्स्य पालनासाठी दिले जात असतात.

वर्तक पाखाडी ते भरणे पाडा दरम्यान सुतारभाट भागात 20 ते 25 एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या वडाळा तलावात खाजऱ्या, रोम, कटला इत्यादी माशांचे बीज सोडण्यात आले होते. एका ठेकेदाराचा मार्फत मोठ्या आकाराच्या माशांना पकडून त्यांची विक्री देखील सुरू होती. दरम्यान शनिवार दुपारपासून या तलावात मृत मासे तलावात तरंगताना दिसू लागले व सायंकाळी त्यांची संख्या हजारो मध्ये झाल्याचे सांगण्यात आले. पाण्यामधील प्राणवायू कमी झाल्याने मासे मृत पावले असतील अशी शक्यता प्रथम व्यक्त करण्यात आली. मात्र गावातील इतर तलावांमध्ये असा प्रकार आढळून न आल्याने मासे मरण्याच्या प्रकारात घातपात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तलावात असणाऱ्या हजारोंच्या संख्ये च्या लहान मोठ्या आकाराच्या मत्स्य संपलेला यामुळे हानी पोहोचली असून तलावातील पाणी देखील दुषित झाले असावे अशी शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.