कासा : विक्रमगड येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील हे एक मुख्य तालुक्याचे तसेच आठवडे बाजाराचे ठिकाण असल्याने तालुक्यातील ४५ ते ५० गावांतील शेतकरी आपला शेतातील माल विकण्यासाठी मोठय़ा संख्येने येत असतात. हा बाजार रस्त्यावरच भरत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
कपडे, चप्पल, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारे विक्रेतेही आपले दुकान रस्त्याच्या कडेला लावतात. नागरिकदेखील मोठय़ा संख्येने बाजार खरेदीसाठी येथे गर्दी करतात. दिवसेंदिवस बाजाराची व्याप्ती वाढत असून शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी जागा अपूर्ण पडत असल्याने शेतकरी माल विक्रीसाठी रस्त्यावर बसत आहेत. या दिवशी विक्रमगड-वाडा, विक्रमगड -जव्हार , विक्रमगड-डहाणू या सर्व रस्त्यावर बाजार भरत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते.
बऱ्याचदा रुग्णवाहिका, बस यांनाही रस्ता मिळत नसल्याने बसच्या प्रवाशांचाही प्रवासात जास्त वेळ जातो, तसेच रुग्णवाहिकेलाही विलंब होतो. वाहतुकीची गर्दी झाल्यानंतर वाहतुकीचे नियम न पाळता मोटार दुचाकी, सायकल चालक रस्ता मिळेल त्या दिशेनेही गाडय़ा चालवत असल्याने बऱ्याचदा चालक व पायी चालणारे प्रवासी यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. तर दररोज भाजी, फळे, सुकी मच्छी विक्रेत्यांची दुकाने रस्त्यावर थाटली जात असल्याने ही समस्या ही नेहमीचीच झाली आहे. बस स्थानकालाही स्वतंत्र जागा नसल्याने बस रस्त्यावरच थांबतात. त्यानंतरही मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विक्रमगडमध्ये दर बुधवारी रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दुचाकीवरून प्रवास करताना गावातून जाण्यासाठी सुद्धा अर्धा तास वेळ लागतो, तरी नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासन यांनी यावर काहीतरी तोडगा काढून ही समस्या दूर करावी. -जय बुधर, ग्रामस्थ.