नियोजनबद्ध विकासाअभावी समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांचे मत
डहाणू : वेगाने वाढणाऱ्या डहाणू शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. डहाणू थर्मल पॉवर रोड, इराणी रोड आणि पारनाका रोड हे मुख्य रस्ते सकाळी तसेच संध्याकाळी वाहनांच्या प्रचंड संख्येने वेढलेले असतात. नियोजनबद्ध विकास न झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच भीषण रूप घेत आहे. नियोजनबद्ध विकास झाल्यास या समस्येला पायबंद घालणे शक्य असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
डहाणू जंक्शन रेल्वे स्थानकामुळे उपनगरांचा झपाटय़ाने विकास होत आहे. मात्र त्यामुळे रहिवाशांबरोबरच रेल्वे प्रवासी, पादचारी तसेच वाहनचालक यांना त्रास होतो. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी डहाणू नगर परिषद, स्थानिक पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे हा प्रश्न सोडवण्यासाठी काही नियमावली तयार केली होती. डहाणूसंदर्भात का होईना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगर परिषदेने उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह होते. मात्र त्यात सातत्य नसल्याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याची कडक अंमलबजावणी करणे अवश्यक आहे. कोणत्याही शहराचा दर्जा येथील रस्ता तसेच मूलभूत सुविधांवरून ठरवला जातो. लोकसंख्येच्या स्फोटामुळे विविध तालुक्यांमध्ये आता वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. डहाणू हे जंक्शन रेल्वे स्थानक आहे. उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून रिअल इस्टेटचे भाव काही वर्षांपूर्वी झपाटय़ाने वाढले.
मात्र ही बांधकामे करताना विकास नियमावलीला बायपास करण्यात आल्याने विकासक इमारतीचे बांधकाम वेडेवाकडे करतात. इमारत करताना डीपी रोड तयार करतात. शहर विकास नियमावलीतील तरतुदीप्रमाणे विकासकाने तो रस्ता विस्तीर्ण करणे आवश्यक असते. मोठी संकुले उभारताना सार्वजनिक रस्ते, पायवाटा यांना बाधा येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याची बाब या नियमावलीत नमूद असते. मात्र या नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर कायम वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सामान्य पादचारी आणि वाहनचालकांना होतोय.
याबाबत नगर परिषदेचे नियोजन सुरू आहे. लवकरच त्यामध्ये बदल दिसून येईल.
– वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद