बोईसर :पालघर तालुक्यातील काटाळे येथे एका शेतकरयाच्या शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी वन्य प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली. अज्ञात वन्यप्राण्याने केलेल्या  हल्ल्यात गोठ्यातील बारा शेळ्यांचा मृत्यू झाला असून पाच शेळ्या जखमी झाल्याने   शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  शेळ्यांवर हल्ला करणारा वन्यप्राणी हा बिबट्या किंवा अन्य प्राणी असण्याची शक्यता असून यामुळे काटाळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचे अधिकाऱ्यानी घटनास्थळी पोचून घटनेचा तपास सुरु केला आहे.

पालघर तालुक्यातील मासवण नागझरी रस्त्यावरील काटाळे गावातील शेतकरी किरण पाटील यांची सूर्या नदीकिनारी शेती व वीटभट्टीचा व्यवसाय असून शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. बागायती शेतीमध्ये  त्यांच्या शेळ्यांचा गोठा असून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वन्यप्राण्याने गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात बारा शेळ्यांचा मृत्यू झाला पाच शेळ्या जखमी झाल्या   असून बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. गोठ्याच्या परिसरात बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून मृत शेळ्यांची मान आणि शरीरावर चावा घेतल्याच्या खुणा देखील दिसून आल्या आहेत.

वन्य प्राण्याकडून शेळ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पालघर वनविभागाला कळविण्यात आले असून  वनविभागाचे अधिकारी, वन कर्मचारी आणि पशु वैद्यकीय अधिकारी  यांनी घटनास्थळी पोचून घटनेचा पंचनामा आणि वन्य प्राण्याच्या  वावराचा तपास सुरु केला आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी किरण पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काटाळे परिसरात प्रथमच बिबट्या किंवा अन्य वन्य प्राण्याचा वावर आढळून आला असून यामुळे परिसरातील लोवरे, खरशेत, वांदिवली, मासवण, निहे या भागातील नागरिक भयभीत झाले आहे. काटाळे गावाच्या पूर्वेला दक्षिणोत्तर डोंगररांग पसरली असून पश्चिमेला सूर्या नदी वाहत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्या नदीच्या पल्ल्याड सागावे, कोकणेर या गावांच्या पाठीमागे तांदूळवाडी, काळदुर्ग ते असावा या किल्ल्यांची डोंगररांग पसरली आहे. याच डोंगररांगेतून सूर्या नदीचे पात्र ओलांडून बिबट्या आला असल्न्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालघर जिल्ह्याच्या जंगलांमध्ये अवैध वृक्षतोड, शिकार आणि वणवे यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व्य धोक्यात आले असून बिबट्यांचे जंगलातील खाद्य कमी होत चालले आहे. यामुळे दाट जंगलातील बिबटे पावसाळा संपल्यानंतर शेळ्या, कोंबड्या, श्वान या सारख्या शिकारीसाठी सहजसोप्या खाद्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊ लागले असून त्यामुळे मानव बिबट्या असा संघर्ष निर्माण होऊ लागला आहे.