|| प्रसेनजीत इंगळे

सर्व शिक्षा अभियानाच्या सर्वेक्षणातील वास्तव

विरार :  पालघर जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील दोन लाख ४४ हजार ९४२ विद्यार्थी करोनामुळे शाळेत जाऊ शकत नाहीत, अशी माहिती शासनाने केलेल्या सर्व शिक्षा अभियानातील सर्वेक्षणानुसार  उपलब्ध झाली आहे.  एकूण विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत शाळेत न जाणाऱ्याचे प्रमाण ३६.२२ टक्के आहे.

राज्य शासनाने कोविड वैश्विक महामारीमुळे किती विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी राज्यभर वयोगट तीन ते १८ म्हणजे अंगणवाडी ते १२ वी पर्यंत सर्वेक्षण केले होते. यात पालघर जिल्ह्यात तीन ते १८ वयोगटातील  एकूण सहा लाख ७६ हजार १७२ विद्यार्थी असल्याचे आढळून आले. यातील सहा लाख ७० हजार  ९९१ विद्यार्थी दाखल आहेत. तर पाच हजार १८१ विद्यार्थी कोणत्याही शाळेत दाखल नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. तर चार लाख ३१ हजार २३० विद्यार्थी हे कोविड सोडून इतर कारणाने शाळेत येत नाहीत.

यात मुख्य कारण शाळा बंद असणे, बिकट आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक कारणे, पालकांचे मागासलेपण, शाळा दूर असणे, मजुरी करणे, अशी इतर अनेक कारणे आहेत. पण या  विद्यार्थ्यांचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाने दिली आहे.  यातील दोन लाख ४४ हजार ९४२ विद्यार्थी हे केवळ कोविड कारणामुळे शाळेत येण्यास नकार देत आहेत. पण   शिक्षण ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुरू असल्याचे सांगितले जाते. पालघर जिल्ह्यातील  कोविडमुळे शाळेत न येणारे विद्यार्थी  इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये ९३ हजार ८६८ मुले व ८६ हजार ६९७ मुली आहेत. तर  सहावी ते आठवीपर्यंत २० हजार ७०० मुले आणि १९ हजार ५३१ मुली आहेत. तसेच नववी ते १२ मधील १२ हजार ५४९ मुले आणि ११ हजार ५२५ मुली   शाळेत येवू शकत नाहीत.  जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे विषय सहायक अधिकारी तानाजी डावरे यांनी माहिती दिली की,  सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे.  शाळाबाह्य मुलांना बालरक्षकांच्या माध्यमातून शाळेत दाखल केले जात आहे. सध्या केवळ ८२ मुले आहेत जी कोणत्याही शिक्षण प्रवाहात नाहीत. त्यांनासुद्धा लवकरच दाखल केले जाईल, असे ते म्हणाले.