वाडा: वाडा तालुक्यात शेतकऱ्यांनी जोडणीसाठी रचून ठेवलेल्या भात पिकाच्या उडव्याला लागल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसात पाठोपाठ घडल्या असून यामागे घातपात व कौटुंबिक शत्रुत्व कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदील झालेला असतानाच दुसरीकडे वाडा तालुक्यातील चांबले गावात गेल्या दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याचे भाताचे भारे पेटवून देण्याची घटना ताजी आहे. शुक्रवारी (१ डिसेंबर) ला रात्री गातेस येथील एका शेतकऱ्याचे खळ्यात झोडणीसाठी ठेवलेले ९०० भाताचे भारे अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना घडल्याने तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा… भारत नेट योजनेत कोट्यावधीचे नुकसान, तीन वर्षांपासून इंटरनेट सेवेत अडथळे
गेल्या दोन दिवसापूर्वी चांबले गावातील शेतकरी दशरथ बाळू पाटील यांच्या भाताचे पीक ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खळ्यात ठेवण्यात आलेले ६०० भाताचे भारे अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी माध्यरात्री नंतर तालुक्यातील गातेस (खुर्द) गावातील शेतकरी श्याम अप्पा पाटील यांच्या घराजवळ ठेवण्यात आलेले ९०० ते एक हजार भाताचे भारे अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. श्याम पाटील यांच्या कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी भाताच्या भाऱ्यांना लागलेली आग रात्रभर विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र शनिवारी सकाळपर्यंत ही आग धुमसत होती. कोणी अज्ञात व्यक्तीने भाऱ्यावर पेट्रोल टाकून ही आग लावली असावी असा संशय पाटील कुटुंबाने व्यक्त केला आहे. वाडा पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी नितेश पाटील यांनी केली आहे. या आगीत श्याम पाटील यांचे दीड ते दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या दोन्ही घटना घडल्या त्या ठिकाणी वाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात वाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.