अद्याप १६ लाख जण लशीच्या पहिल्या मात्रेच्या प्रतीक्षेत

पालघर : पालघर जिल्ह्यत एका दिवसात ६९ हजार नागरिकांचे लसीकरणाची क्षमता असल्याचे जिल्हा प्रशासनाने राज्य तसेच केंद्र शासनाला दाखवून दिले आहे. जिल्ह्यतील अजूनही १६ लाख नागरिकांना लशीची पहिली मात्रा देण्याचे प्रलंबित असून केंद्र शासनाने लस उपलब्ध करून दिल्यास जिल्हा प्रशासन जलदगतीने लसीकरण करू शकते हे प्रशासनाचे दाखवून दिले आहे.

१ सप्टेंबर रोजी ग्रामीण जिल्ह्यत ११३ केंद्रांवर कोविशिल्ड तर सहा केंद्रांवर कोवॅक्सिन लशीच्या मात्रा देण्यात आल्या. या बरोबरीने महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यत एका दिवसात ६८ हजार ९७६ इतके विक्रमी लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्ह्यने एका दिवसात फक्त २२ हजार लसीकरणाचा टप्पा गाठला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्याचे व स्थानिक स्वराज संस्थेच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे.

पालघर जिल्ह्यत लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या २४ लाख नागरिकांपैकी ११ लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ८.१२ लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर २.८७ लाख  नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे.

जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ४७ लाख लसमात्रांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात एकाच दिवशी दीडशे केंद्रांवर लसीकरण करण्याची जिल्ह्यची क्षमता असल्याचे जिल्हा प्रशासनाने दर्शवून दिले आहे. पालघर जिल्ह्यसाठी लस उपलब्धतेची समस्या सुरुवातीपासून असून जिल्ह्यला अधिकाधिक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास नागरिकांचे लसीकरण कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने विक्रमी लसीकरण उद्दिष्ट गाठताना शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध झाली असताना देखील लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर गर्दी झाल्याचे चित्र होते. मात्र लसीकरणासाठी आलेल्या बहुतांश नागरिकांना लस उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येते. अनेक केंद्रांवर लसीकरण सायंकाळी उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. या लसीकरणाच्या विशेष मोहिमेकरिता जिल्हा प्रशासनाने गोकुळाष्टमीच्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेचे आयोजन करून लसीकरणासाठीचे नियोजन केले होते.