कासा : पालघर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती मधील पोटनिवडणुका सहा महिन्यांपूर्वी पार पडल्या मात्र या या निवडणुकीत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन दिले गेलेले नाही. पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषद शिक्षक तलाठी ग्रामसेवक आश्रम शाळेतील शिक्षक शिपाई असे सर्व प्रकारचे शासकीय कर्मचारी कामासाठी घेण्यात आले होते.
कुठल्याही प्रकारची निवडणुका आल्यानंतर निवडणूक आयोगाला मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. त्यासाठी निवडणूक आयोग प्राथमिक शिक्षक, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामसेवक, आश्रम शाळातील शिक्षक, शिपाई अशा सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामासाठी घेत असतो.
निवडणूकचे प्रशिक्षण प्रत्यक्ष निवडणूक आशा जवळपास चार दिवसांचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागते. या चार दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवास, जेवण खर्च स्वत:च्या पैशाने करावा लागतो त्याचा मोबदला म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना मानधन देते, अशी एकंदर पद्धत आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या १५ व पंचायत समितीमधील १४ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ५ऑक्टोबर रोजी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या पोटनिवडणूक होऊन सहा महिने झाले तरी अद्याप कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.
केवळ आश्वासन
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक झाल्यानंतर कुठल्याही कर्मचाऱ्याला हे मानधन दिले गेले नाही. निवडणूक झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधन वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते . परंतु अद्यापही मानधन जमा न झाल्याने निवडणूक कामाचे कर्मचारी मानधन जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.