वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात स्थानिक आक्रमक; ३० नोव्हेंबरपासून बेमुदत लाक्षणिक उपोषण

वाडा : वाडा-भिवंडी या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे, वाहने नादुरुस्त होत आहेत. अनेकदा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलने झाली आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे शसनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील स्थानिक नागरिक ३० नोव्हेंबरपासून वाडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करणार आहेत.

वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जात नाही.

मनोर-वाडा-भिवंडी या ६५ किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने गेल्या १२ वर्षांपूर्वी बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावर केले आहे.

या राज्य महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट व अपूर्ण असतानाही या ६५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुप्रीम कंपनीने दोन ठिकाणी (कवाड व वाघोटे) टोल नाके उभारून कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय केला. वाहनधारकांकडून टोल वसूल करूनही या नादुरुस्त व अपूर्ण रस्त्याकडे लक्ष दिले नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेल्या दहा वर्षांत अनेक अपघात होऊन दीडशेहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले. तर पाचशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

 या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सुप्रीम कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे उच्च न्यायालयाने या दोन्ही मार्गावरील टोल बंद करण्याचे दोन वर्षांपूर्वी आदेश दिले. या मार्गावरील टोल बंद करुन या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांच्याकडे दिली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाडा यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या दोन वर्षांत ठेकेदारामार्फत चार ते पाच कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनेक संघटना, पक्ष यांनी रस्ता रोको, उपोषण अशी आंदोलने केली आहेत. मात्र या आंदोलनाकडे शासन, प्रशासन यांनी दुर्लक्षच केले. पुन्हा एकदा येथील स्थानिक जनतेने या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ३० नोव्हेंबरपासून लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. मनोर-वाडा-भिवंडी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग केला तरच या महामार्गाची समस्या कायमस्वरूपी सुटेल.

डॉ. विवेक पाटील, अध्यक्ष, वाडा-भिवंडी रस्ता संघर्ष समिती, वाडा