वाडा : तालुक्यातील घाटाळपाडा (सोनशिव) येथे आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असतानाच येथील थोडेफार पाणीसाठा असलेली विहीर बुधवारी (२७ एप्रिल) कोसळल्याने या ठिकाणी नवे पाणी संकट उद्भवले आहे.
सव्वाशेहून अधिक लोकवस्ती असलेल्या घाटाळपाडय़ात पिण्याच्या पाण्यासाठी ही एकमेव विहीर आहे. या पाडय़ात कूपनलिका (बोअरवेल) असून या कूपनलिकेतून दूषित पाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळल्याने येथील महिलांवर एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विहिरीचा निम्माअधिक संरक्षक कठडा कोसळल्याने या ठिकाणी येणारी गुरेढोरे विहिरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या महिलांनाही या कोसळलेल्या विहिरीपासुन धोका निर्माण झाला आहे. पंधरा वर्षांपुर्वी या विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. वर्षभर पाणीसाठा रहात असलेली ही विहीर अचानक कोसळल्याने येथील रहिवाशांवर मोठे पाणी संकट उभे ठाकले आहे, असे सोनशिव येथील रहिवासी नितेश मराडे यांनी सांगितले.
पाणी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी या विहीर परिसरात कुपनलिका खोदून देण्याबाबत विचार केला जात आहे.-प्रतिभा बर्फ, ग्रामसेविका, ग्रामपंचायत, सोनशिव, ता. वाडा.