डॉ. मंगला गोमारे
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी
एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही वर गेले आहे. त्यामुळे आता करोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील वाढता संसर्ग, उपाययोजना आणि लसीकरण याबाबत अधिक समजून घेण्यासाठी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी साधलेला हा संवाद..
’ मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे का?
एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून निश्चितच मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे. याआधी शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही खाली होती. नंतर ही रुग्णसंख्या साधारण ५० च्या घरात आली; परंतु तिसऱ्या आठवडय़ापासून रुग्णसंख्येत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आणि ही वाढ पुढे कायम राहिली आहे. परिणामी, आता दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्याही पुढे गेली आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. तसेच मृत्यूही जवळपास शून्य आहेत. तेव्हा सर्वेक्षणावर सध्या अधिक भर दिला जात आहे.

’ सर्वेक्षणावर भर वाढविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत?
करोनाबाधितांचे वेळेत निदान झाल्यास संसर्ग नियंत्रणात आणणे शक्य होईल. रुग्णालयात तापजन्य, श्वसनाच्या विकाराच्या उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांच्या करोना चाचणी करण्याच्या सूचना आधीच दिलेल्या आहेत. १०० टक्के रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत का यावर आता बारकाईने लक्ष ठेवले जाईल. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणावरही अधिक भर दिला जाणार आहे. मोठय़ांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी वर्धक मात्रा आणि लहान मुलांचे लसीकरण वाढविण्यासाठी विविध स्तरांवर अधिक प्रयत्न करण्यात येणार आहेत. लसीकरण १०० टक्के पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमधील चिंता कमी आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पालनावर दुर्लक्ष केले जात आहे. संसर्ग रोखण्यामध्ये नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. मुखपट्टीची सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे, लसीकरण पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

’ मुंबईत सध्या दैनंदिन १०० हून अधिक रुग्ण आढळत असूनही त्या तुलनेत यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे असे वाटते का?
एखादा आजार अंतर्जन्य स्थितीमध्ये गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याच्या प्रक्रिया किंवा पद्धती फारसे महत्त्वाचे ठरत नाही. कारण आता सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. नागरिकांचा मुक्त वावर सुरू आहे. त्याच्यामुळे बाधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी या सर्व व्यक्तींचा शोध घेणे अधिक आव्हानात्मक आहे. सध्या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध नक्कीच कमी प्रमाणात घेतला जात आहे. या व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेले कुटुंबातील व्यक्ती किंवा कामाच्या ठिकाणचे सहकारी या सर्वाच्या चाचण्या करण्यावर आता अधिक लक्ष देण्यात येईल.

’ शहरात कोणत्या भागांमध्ये रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढत आहे?
शहरात अंधेरी पश्चिम या भागात सुरुवातीपासून रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. आताही याच भागामध्ये रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत आहेत. गेल्या आठवडय़ाभरात जवळपास १०० रुग्ण या भागात आढळले आहेत. वांद्रे पश्चिम, आर दक्षिण, एफ उत्तर या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही भागांमध्ये संख्यात्मकदृष्टय़ा रुग्णसंख्येत फार वाढ झालेली नाही; परंतु टक्केवारीमध्ये वाढ जास्त दिसते. उदाहरणार्थ मागच्या आठवडय़ात आर उत्तरमध्ये तीन रुग्णसंख्या होती. या आठवडय़ात पाच रुग्ण आढळले आहेत.

’ या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढण्यामागची काही कारणे आहेत का किंवा समूहाने रुग्ण आढळत आहेत का?
शहरात कोणत्याही भागात अजून तरी समूहाने रुग्ण आढळलेले नाहीत. एका प्रभागामध्ये रुग्ण आढळून येत असले तरी एकाच परिसरात किंवा एकाच इमारतीमध्ये रुग्ण आढळलेले नाहीत. दर आठवडय़ाला वेगवेगळय़ा विभागांमध्ये काही अंशी वाढ झाल्याचे आढळते. मुंबईत नागरिक एका ठिकाणाहून अनेक ठिकाणी प्रवास करत असल्यामुळे रुग्णाला कोणत्या भागात संसर्गाची बाधा झाली, याचा शोध घेणे अत्यंत अवघड आहे. एखाद्या भागामध्ये रुग्णसंख्या जास्त का आहे, याची सध्या तरी काही ठोस कारणे आढळलेली नाहीत.
’ या विभागांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी काय ठोस उपाययोजना केल्या जात आहेत?
शहरातील या काही विभागांमध्ये रुग्णसंख्या वाढली असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहितच आहेत. रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या विभागांमध्ये चाचण्या अधिकाधिक कशा वाढविल्या जातील यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई महानगरामध्येही रुग्णवाढ होत आहे का?
मुंबईत रुग्णसंख्या वाढली की काही काळाने महानगर प्रदेशातही रुग्णसंख्या वाढण्याचा कल गेल्या तिन्ही लाटांमध्ये अनुभवलेला आहे. मुंबईबाहेरून कित्येक नागरिक दर दिवशी मुंबईत विविध कामांनिमित्ताने येत असतात. त्यामुळे शहरात रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली की याचा परिणाम महानगर प्रदेशात दिसून येतो.

’ राज्यभरात १२ वर्षांवरील बालकांसाठीचे सर्वात कमी लसीकरण मुंबईत झाले आहे असे का?
प्रौढांचे लसीकरण आपण १०० टक्के पूर्ण केले असले तरी १२ वर्षांवरील बालकांच्या लसीकरणाला मुंबईत निश्चितच कमी प्रतिसाद मिळत आहे. या आजाराची तीव्रता कमी झाल्यामुळे नागरिकांमधील भीती आता खूप कमी झालेली आहे. त्यामुळेही बालकांमधील लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. अगदी सुरुवातीला आम्हाला वाटले की परीक्षा आहे म्हणून लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. परीक्षा संपल्यावर लसीकरण वाढेल; परंतु परीक्षा संपल्यानंतरही अनेक उपाययोजना केल्यावर काही प्रमाणात लसीकरणात वाढ झाली. परंतु फारसा वेग घेतला नाही. सुट्टय़ा लागल्याने अनेक जण आता बाहेर जात असल्यामुळे बालकांचे लसीकरण करून घेण्यास फारसे तयार नाहीत हेही एक कारण आहे; परंतु आता या बालकांचे लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक विभागस्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आवश्यक तेथे शिबिरे लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

’ वय वर्षे पाचखालील बालकांच्या लसीकरणाची काय तयारी केली आहे?
या बालकांच्या लसीकरणासाठी अशी वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नाही. लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह लसीकरण केंद्रामध्ये सर्व बाबी उपलब्ध आहेत. आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ घेतले जाईल.

– मुलाखत : शैलजा तिवले