पालघर: माकूणसार गावातील पोंडारोड रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून घाणीचे पाणी वाहत असल्यामुळे रस्त्यावर चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मारली.
पोंडारोड रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून घाणीचे पाणी वाहत असल्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना चालणे कठीण झाले असून या भागातील ग्रामस्थांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी मागील तीन महिन्यापासून लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या तसेच सरपंच माकूणसार यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली होती, ग्रामपंचायतकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील हा प्रश्न सुटला नाही.
याचा निषेध म्हणून आज पोंडा रोड परिसरातील महिलांनी ग्रामपंचायत माकूणसारवर धडक दिली आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सरपंचांकडे मागणी केली.
या बाबत सरपंचांकडे महिलांनी प्रश्न कधी सुटणार आहे, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे का अशा प्रश्नांची सरबत्ती केली. ग्रामस्थ संकेत पाटील यांनी सरपंचांकडे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली, तसेच या पाण्यामुळे रस्त्यावरील डांबर उखडून तयार झालेले खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी सरपंच यांच्याकडे केली असता सरपंचांनी हा प्रश्न येत्या २० ऑक्टोबपर्यंत निकाली काढू असे लेखी आश्वासन दिले.