वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याचा आरोप

कासा :  खोडाळय़ाजवळील वीज उपकेंद्राचे काम अत्यंत संथगतीने चालू असताना संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालून अपूर्ण वीज उपकेंद्र ताब्यात घेण्यासाठी वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव येत असल्याचे समोर आले आहे. खोडाळा येथील नागरिकांनी याला पुष्टी दिली आहे. यामागे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचे काही आर्थिक हितसंबंध असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपूर्ण उपकेंद्र ताब्यात घेतल्यास युवा सेनेने  आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मोखाडा ते खोडाळा हे अंतर २० किमी असून खोडाळा परिसरातील पाडय़ांत १५ ते २० किमीचे अंतर असल्याने मोखाडा वीज केंद्रातून वीजपुरवठा करताना अनेक अडचणी येतात. पावसाळय़ात विजेचे खांब पडणे, तारांवर झाडे पडणे आदी अडचणींमुळे दोन-चार दिवसही वीजपुरवठा खंडित होतो. थेट मोखाडा वीज केंद्रावरून वीजपुरवठा करीत असताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता खोडाळा विभागासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र असावे या हेतूने खोडाळय़ाजवळ उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र गेली दोन-तीन वर्षे हे काम अपूर्णच आहे. उपकेंद्रासाठी बांधलेल्या इमारतीत रस्ते, पाण्याची सोय नाही. वाकडपाडा ते कारेगाव वीजजोडणी नाही. या मार्गावरील झाडे तोडणीही झालेली नाही. त्याचप्रमाणे उपकेंद्र सुरू होण्याआधीच तेथील ट्रान्सफॉर्मर गेल्याने जुना ट्रान्सफॉर्मर जोडलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित चालत नाही. येथे  संरक्षण भिंतसुद्धा नाही. अशा प्रकारे ठरलेल्या कामांपैकी २६ कामे अपूर्ण असूनही वरिष्ठ पातळीवरून हे उपकेंद्र ताब्यात घेण्याच्या सूचनावजा धमक्या मोखाडा कार्यालयाला दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. लवकरात लवकर उपकेंद्राचे काम पूर्ण करा आणि मगच ते ताब्यात द्या, अशी मागणी खोडाळेवासीय करत आहेत, तर ठेकेदारासाठी नव्हे जनतेसाठी काम करण्याची अपेक्षा पालघर वीज मंडळाकडून व्यक्त होत आहे. याविषयी जनतोपयोगी आणि वेळेवर कार्यवाही न झाल्यास युवा सेनेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. उपकेंद्राची अपुरी राहिलेली २६ कामे करून मगच ते सुरू करावे, ही आमची मागणी आहे. ठेकेदाराच्या फायद्यासाठी अपूर्ण वीज केंद्र ताब्यात घेतल्यास आम्ही नक्कीच आंदोलन छेडू, असा इशारा युवा सेनेचे नेते राहुल कदम यांनी दिला आहे.