काम मिळत नसल्याने कामगारांची उपासमार

पालघर : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाका कामगारांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पूर्वीसारखे हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. करोनापूर्वीच्या काळात बांधकाम, गवंडी, बिगारी, रंगारी, साफसफाई आदी रोजंदारीवर असेलेली अनेक कामे उपलब्ध होती.  दररोज नाक्यावर उभे राहिले की काम हमखास मिळत असे. आता बांधकामासह इतर कामे मंदावल्यामुळे नाका कामगारांना हवे तसे काम मिळेनासे झाले आहे.  मजुरीच्या दरात घट करुनही  काम नसल्यामुळे नाक्यावरून निराश होऊन त्यांना माघारी परतावे लागत आहे.  

  अनेक ठिकाणी टाळेबंदी होईल की काय अशी भीती आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांची आपली कामे मंदावली आहेत. तर काहींनी  नुकसान होईल या भीतीने ती आधीच बंद केली आहेत. याचा मोठा फटका कुशल-अकुशल कामगारांना बसत आहे.  हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ या कामगारांवर ओढावणार असल्याचे एका  कामगाराने सांगितले.  पूर्वी सकाळी आठ ते नऊ  वाजेपर्यंत मजुरांना काम मिळत होते. आता दहा ते बारा वाजेपर्यंत त्यासाठी थांबावे लागते तरीही काम मिळण्याची शाश्वाती नसते.  आठवडय़ातून तीन -चार वेळाच काम मिळत आहे. त्यामुळे हातात पैसे राहत नाहीत. उसनवारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो असे कामगारांकडून सांगितले जाते. 

५० टक्के कामगार कामापासून वंचित

पालघरसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या  मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी हे कामगार नाके आहेत.  या नाक्यावर स्थानिक व परप्रांतीय असे चारशे ते पाचशे मजूर काम मिळण्यासाठी उभे राहतात यातील ७०टक्के मजुरांना दोन-तीन महिने आधी का मिळत होते मात्र आता ५० टक्के  मजुरांनाही काम मिळत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून दररोज दोनशे ते अडीचशे मजूर काम नसल्याने माघारी फिरत आहेत.

रोजगार हमी योजना चांगला प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाका कामगारांना काम मिळत नसले तरी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांना चांगलाच जोर  आहे. सद्य:स्थितीत एक हजार तीनशेपेक्षा जास्त कामे सुरू असून या कामांवर गेल्या आठवडय़ात ८२ हजारांपेक्षा जास्त अकुशल मजूर उपस्थित होते. तर मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट शंभर टक्केपेक्षा जास्त आहे. मनुष्यदिन उपस्थितीत पालघर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. अलीकडे योजनेवर कामाला येणाऱ्या मजुरांना माध्यान्ह भोजनाची व्यवस्था केल्याने मजूर उपस्थिती वाढत आहे, असे सांगितले जाते.