शिक्षक संघटनांचा विरोध

वाडा: पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी गणवेश (ड्रेसकोड) सक्तीचा करण्याचा ठराव घेतला आहे. मात्र या ठरावाला काही शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. प्रतिवर्षी दोन गणवेशांसाठी अनुदान व धुलाई भत्ता जिल्हा परिषद देणार असेल तर गणवेशाला आमचा विरोध नाही, असे शिक्षक सेना या संघटनेने शिक्षण समितीच्या ठरावाबाबत कळविले आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी कुठल्याही प्रकारच्या एकाच रंगाचा गणवेश व शिक्षिकांसाठी साडी असा गणवेश असावा, असा ठराव घेण्यात आला आहे. या ठरावाच्या आधारे वाडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी जयवंत खोत यांनी तालुक्यातील सर्व केंद्रांतील केंद्रप्रमुखांना  पत्राद्वारे कळवून  यासंबंधी आपापल्या केंद्रांतील शिक्षकांना सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिक्षकांना गणवेश सक्ती करून वाद निर्माण करण्यापेक्षा शिक्षण समितीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, तसेच पालघर पालघर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची सुमारे २० टक्के पदे रिक्त आहेत, ही पदे भरण्याला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका पालघर जिल्हा शिक्षक सेना या संघटनेने घेतली आहे.

गणवेश सक्ती करायची असेल तर जिल्हा परिषदेने प्रत्येक शिक्षकाला दोन गणवेशांचे अनुदान व धुलाई भत्ता द्यावा.

– मनेश पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना पालघर जिल्हा