News Flash

संवादातून बदल

आपल्याला पदोपदी काही ना काही ठरवायला लागतं, उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

उत्पल व. बा. utpalvb@gmail.com

स्त्री ही पुरुषाच्या कामेच्छेचा विषय आहे तो जैविक अंगाने,  सामाजिक अंगाने स्त्री हा मनुष्यत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विषय आहे. परंतु या दोन्ही अंगांनी या विषयाचं प्रगल्भ ज्ञान त्याला झालेलं नाही. पितृसत्ताक व्यवस्था त्याला स्त्रीच्या अंतरंगाशी एकरूप होऊन तिला समजून घेऊ देत नाही तर कामेच्छेचं नियोजन न झाल्याने ती उफाळून वर येत त्याच्या विवेकाचाही कब्जा घेते. अशा परिस्थितीत त्याचा जर स्त्रीशी संवाद होत राहिला तर बदलाची शक्यता वाढेल..

आपण जी संस्कृती निर्माण केली आहे, ज्या मान्यतांच्या आधारे आपण जगतो, आपले व्यवहार पार पाडतो त्यातला एक लक्षणीय भाग ‘निर्णय घेणे’ हा आहे. आपल्याला पदोपदी काही ना काही ठरवायला लागतं, उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागतो. यातला एक कळीचा भाग ‘चूक’ आणि ‘बरोबर’ ठरवणे हा आहे. ‘चूक’ आणि ‘बरोबर’च्या मुळाशी ‘नीतिविचार’ आहे. हा ‘नीतिविचार’ पूर्णपणे सुसंगत, गणिती प्रक्रियेने चालणारा नसतो. तो सामाजिक असतो आणि या नीतिविचारावर प्रभाव टाकणारी आपल्याच मनातील वैचारिक आणि भावनिक बले असतात. त्यांच्या परिणामी आपला ‘नीतिविचार’ आकार घेतो. मागच्या लेखात आपण म्हटलं तसं सांस्कृतिक रचितं तयार होत असताना, ती अस्तित्वात असताना वास्तविक रचितंही असतात. आपण ज्याला वाईट, चूक असं म्हणतो ते समाजासाठी वाईट आणि चूक असलं तरी वास्तवात ते ‘असतं’ हेच पुरेसं बोलकं आहे. नीतिविचारांचा प्रयत्न समाजाची घडी बसवायचा असतो, परंतु अशा पुष्कळ जागा असतात जिथे नीतिविचार पुरा पडत नाही. त्यामुळे नैतिकता समाजासाठी असली तरी ती अखेरीस व्यक्तिनिष्ठ राहते.

म्हणूनच समाजात जे जे प्रश्न दिसतात त्यांचा विचार निव्वळ नैतिकतेच्या कसोटीवर करून चालत नाही. अमुक एक वर्तन सर्वाच्या हिताचं आहे म्हणून बरोबर आहे हे ठीक. परंतु त्याच्याही पुढे जाऊन ते नैसर्गिकरीत्याच बरोबर आहे असा आग्रह धरला जाणं थोडं गडबडीचं आहे. मुळात नैसर्गिक म्हणजे काय याबाबतच आपला बरेचदा घोळ होतो. कारण वर्तनाला आपण नैतिकतेच्या फूटपट्टीने मोजायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात जे ‘चांगलं’ आहे आणि जे ‘वाईट’ आहे ते सगळं नैसर्गिकच आहे. निसर्ग हा ‘चांगला’, ‘दयाळू’, ‘क्षमाशील’ असा काही नसतो. निसर्ग म्हणजे ‘असणं’. निसर्गाला मूल्यदृष्टी नाही. असलीच तर ‘अस्तित्वदृष्टी’ आहे. अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षांचं अविरत फिरणारं चक्र हा निसर्गाचा प्रमुख भाग आहे. त्यात आपण ज्याला ‘चांगलं’ म्हणतो असे पैलू आहेत आणि आपण ज्याला ‘वाईट’ म्हणतो असे पैलूही आहेत. ‘चांगलं’ आणि ‘वाईट’, ‘चूक’ आणि बरोबर’ हा निर्णय सतत घ्यावा लागत असल्याने माणूस निसर्गत: जसा आहे तसा व्यक्त होत नाही. माणसावर नियंत्रण असावं या हेतूच्या पूर्ततेसाठी ते योग्य असलं तरी त्यामुळे माणसाची घुसमट होणे आणि त्यातून दुर्वर्तन होणे ही देखील एक बाजू आहे.

‘दुर्वर्तन’ त्रासदायक असल्यानेच तो अभ्यासाचा विषय असायला हवा. आपल्या अंतरंगात भावभावनांचा, उलटसुलट विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. परंतु तो उलगडून समोर मांडण्याची पद्धत आपण विकसित केलेली नाही. आपण भाषेच्या माध्यमातून आपल्या मनातील बोचऱ्या, दुखऱ्या, गोंधळलेल्या जागांचं नेमकं वर्णन करू शकलो तर आपलं सहअस्तित्व पुष्कळच सुकर होईल. इथे काळजी घ्यायची आहे ती एकच. ‘तुझ्या मनात असं आलंच कसं?’, ‘हे काही तरी भयंकरच आहे’ अशा प्रतिक्रिया न देता मनातलं आधी पूर्ण ऐकून घ्यायचं. कारण मनातलं भयंकर असलं तरी ते ‘असतं’. मागच्या लेखात आपण लैंगिक गुन्ह्यंवरील उपायांसंबंधी बोलू असं म्हटलं होतं. मला पुरुषांच्या संदर्भात, त्यांच्या कामेच्छेच्या संदर्भात त्यांनी त्यांची कामेच्छा स्त्रीकडे स्पष्टपणे प्रकट करावी आणि त्यामुळे बिचकून न जाता स्त्रीने ती ऐकून त्यावर आपला निर्णय द्यावा हा एक पहिला उपाय सुचवावासा वाटतो. आपण पुरुषांबाबत बोलतो आहोत म्हणून पुरुषाचा उल्लेख केला आहे. वास्तविक विविध प्रकारचं ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ असणाऱ्या सर्वानाच ते लागू होतं.

आता हे बोलायला, लिहायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात करायला अवघड आहे असा प्रतिवाद होईल. तो बरोबर आहे. कारण आपण कामेच्छेचा निषेध पुष्कळ केला आहे. कामेच्छेला समजून घेतलेलं नाही. इथे पुन्हा प्रेमाचीच आठवण होते. प्रेम म्हटलं की आपल्याला ‘लफडं’ आठवतं. आपण प्रेमाकडे निर्मळपणे पाहण्यात बरेचदा कमी पडतो. (आता पुढे बोलायचं झालं तर आपण राग, द्वेष, मत्सर, अहंकार या आणि अशा विविध भावच्छटांनाही समजून घेत नाही. ‘द्वेष करणं हे वाईट’ हे ठीक आहे, पण तरी ‘द्वेष’ वाटतो. त्याचं काय? आता त्यावर काम करायचं तर आधी त्याविषयी बोलायला हवं. ते ऐकून घेतलं जायला हवं. या भावभावनांची ताकद फार मोठी आहे. त्यांच्या प्रभावामुळे पडलेला लहानसा तडा जर वेळीच सांधला गेला नाही तर पुढे जाऊन आणखी विध्वंस होऊ शकतो. सध्या इथे थांबून कामेच्छेकडे परत येऊ.)

कामेच्छेवर त्वरित अंमल करण्याची पुरुषाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला वळण देण्यासाठी कामेच्छेचं शब्दातून प्रकटीकरण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. शिवाय पुरुषांना (मुलांना) त्याबाबत कुणा स्त्रीशी बोलता आलं तर अधिकच बरं होईल. पुरुषाची सामाजिक आणि जैविक गोची झाल्याने त्याचं कामविश्व एकुणातच डळमळीत, अस्थिर, गुंतागुंतीचं, त्याच्या मनोविश्वावर ‘हावी’ होणारं झालं आहे. स्त्री ही त्याच्या कामेच्छेचा विषय आहे तो जैविक अंगाने, सामाजिक अंगाने स्त्री हा मनुष्यत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विषय आहे. परंतु या दोन्ही अंगांनी या विषयाचं प्रगल्भ ज्ञान त्याला झालेलं नाही. पितृसत्ताक व्यवस्था त्याला स्त्रीच्या अंतरंगाशी एकरूप होऊन तिला समजून घेऊ देत नाही तर कामेच्छेचं नियोजन न झाल्याने ती उफाळून वर येत त्याच्या विवेकाचाही कब्जा घेते. अशा परिस्थितीत त्याचा जर स्त्रीशी संवाद होत राहिला तर बदलाची शक्यता वाढेल. माझा व्यक्तिगत अनुभवही याला पुष्टी देणारा आहे. हेटरोसेक्शुअल पुरुष म्हणून माझं कामविश्व कसं आहे, त्यातल्या अवघड जागा कोणत्या, प्रश्न कोणते हे सगळं ऐकून घेणाऱ्या मैत्रिणी जेव्हा मला भेटल्या आणि त्यांनी जेव्हा ‘तुला जे होतंय ते ठीक आहे. त्याचा ताण घेऊ नकोस. त्याविषयी आपण बोलत राहू,’ असं सांगितलं तेव्हा माझा मानसिक  भार हलका व्हायला मदत झाली. (मला अशा मैत्रिणी उशिरा आणि एक दोघीच भेटल्या. आज जी मुले विशीत आहेत त्यांना अशा मैत्रिणी असतील अशी आशा!)

कामेच्छा स्त्रीसमोर शब्दांतून प्रकट केल्याने त्यातील तीव्रता, अनावरता कमी व्हायला मदत होण्याबरोबरच या विशिष्ट इच्छेचं ‘सामान्यीकरण’ व्हायलाही मदत होईल. पुरुष आणि स्त्री दोघांनाही ही इच्छा सहजभावाने घेता येणं शक्य होईल. यापुढे जाऊन कामेच्छेचं नियोजन हा मुद्दा येतो. इथे जे पुरुष विशिष्ट ‘प्रॉब्लेम एरियाज’ आहेत तिथे काम करण्याची एक कल्पना मला सुचते. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, अगदी घरातदेखील होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ ही एक मोठी समस्या आहे. याबाबत कायदाही केला गेला आहे आणि कायद्यातील तरतुदींमध्ये पुरुषांचं प्रशिक्षण, सुधारणा यासाठीची स्पेस उपलब्ध आहे. लैंगिक दुर्वर्तन करणारा पुरुष आढळल्यास त्याच्या मानसिकतेचं ‘ऑडिट’ करण्याची काही एक प्रक्रिया होऊ शकली तरी त्याच्यात सुधारणा व्हायची शक्यता वाढेल. स्त्रीची स्वतंत्र आणि सक्षम व्यक्ती म्हणून नोंद देण्याची वृत्ती घडवणं आणि त्याबरोबरच त्याच्या कामविश्वाबाबत त्याला बोलतं करून त्याची ‘तपासणी’ करत राहणं अशा दोन उद्देशांनी हे ‘ऑडिट’ करता येऊ शकेल. याला पुरुष चटकन् तयार होणार नाहीत हे खरं, परंतु माणसाला बोलतं करण्यासाठी काही क्रिएटिव्ह उपाययोजना करता येतात. त्यातून हळूहळू माणसं मोकळी होतात. उदाहरणार्थ एखाद्या ऑफिसमधल्या पुरुषांना ‘मला सतावणारे कामविषयक प्रश्न’, ‘मला माझ्या आसपासच्या स्त्रियांबद्दल काय वाटतं’ किंवा या धर्तीवरचे प्रश्न देऊन त्यांना त्यांचं म्हणणं निनावी पद्धतीने लिहायला सांगता येईल. पुरुषांची मानसिकता बदलायला हवी आहे यात शंकाच नाही.  ती कशी बदलायची हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कल्पनाशक्ती राबवावी लागेल.

लैंगिक कुतूहल जागं होणं या पहिल्या टप्प्यापासून ते विस्कळीत, वाईट प्रकारे मनात रुजणं या दरम्यानच्या विविध टप्प्यांवर पुरुषांसाठी काही कार्यक्रम आखता येतील. कोणत्याही सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या विषयासारखाच हाही विषय सविस्तर बोलण्याचा आहे. आपला समाज फार मोठय़ा प्रमाणात विभाजित आहे. त्यामुळे मुंबईतल्या एखाद्या मोठय़ा ऑफिसमध्ये काम करणारा विवाहित पुरुष आणि त्याच मुंबईत रोजंदारीवर काम करणारा एखादा स्थलांतरित मजूर यांच्या कामविश्वाबाबत वेगळा विचार करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट ही की स्त्रीला निर्भयपणे, कुठल्याही बा ताणाशिवाय वावरता येण्यासाठी आपण पितृसत्ताक व्यवस्थेचा, पारंपरिक पुरुषी मानसिकतेचा निषेध करण्याच्या पलीकडे जाऊन या व्यवस्थेत, मानसिकतेत बदल व्हावेत यासाठी एकत्र येऊन आपण काय करू शकतो हे शोधणं. स्त्री-पुरुष संबंध आणि विशेषत: कामेच्छा हा ‘अस्थिर’ विषय आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णायक बोलण्याची घाई न करता विश्लेषणात्मक बोलण्याची मानसिकता तयार करणे हा यातला पहिला टप्पा ठरेल.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 1:01 am

Web Title: changes possibility from conversation with woman
Next Stories
1 पुरुषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरुष
2 बदलाची मानसिकता
3 ‘प्रोग्रॅमिंग’च्या पलीकडचं प्रेम
Just Now!
X