
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत मोरे यांची पक्षानं पदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर्स येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली असताना रुपाली ठोंबरे यांनीदेखील आता यावर भाष्य केलं आहे.

रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंना आपण मनसे सोडून जाताना केलेल्या टीकेची आठवण करुन दिली आहे.

“आता प्रत्यक्षात रिकामटेकडं कोण आहे ते आता पुणेकरांना कळेलं. मला वाटतं ही रुपाली पाटील यांनी केलेली राजकीय आत्महत्या आहे. रिकामटेकड्यांचा त्रास झाला असं रुपाली पाटील यांनी म्हणणं हा फार मोठा जोक आहे,” असं विधान वसंत मोरे यांनी रुपाली पाटील यांनी मनसे सोडल्यानंतर केलं होतं.

“मी मनसेचा राजीनामा दिला होता त्यावेळी माझे बंधू म्हणाले होते की, ताईची राजकीय आत्महत्या केली. वसंतभाऊ आज तुमची हत्या केली की आत्महत्या आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे,” असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

तरीदेखील वसंतभाऊसारखा कार्यक्षम लोकप्रतिनीधीचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कालही स्वागत केलं आहे असं सांगत यावेळी त्यांनी पक्षप्रवेशाची ऑफर दिली.

कधी कधी निर्णय घ्यावा लागतो. लोकप्रतीनीधींमध्ये निर्णयक्षमता असावी लागते. कालच वसंत मोरे यांनी निर्णय घेतला असता, तर आज ही वेळ आली नाही असंही त्या म्हणाल्या.

“वसंत मोरेंचं काम आपण पाहिलं आहे, ते खूप चांगलं काम करतात. त्यांना सर्व जातीपातीची लोक मतदान करतात,” असं रुपाली पाटील यांनी म्हटलं.

“आज ज्या पद्धतीने ही खांदेपालट झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे,” असं स्पष्ट मत रुपाली ठोंबरे यांनी मांडलं.

“मात्र साईनाथ बाबर यांच्या प्रभागातही मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे, त्यामुळे ही कुठली खेळी आहे हे कळत नाही,” असेही त्या म्हणाल्या आहेत.

मनसेत हेच चालतं असा आरोपही त्यांनी केला.

“वसंत मोरे हे प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. मोरे यांना ज्याप्रकारे शहराध्यक्षपदावरून दूर करण्यात आलं, ती दुर्दैवी गोष्ट आहे,” असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितलं.

“मनसेच्या अंतर्गत राजकारणातून ही खेळी खेळली गेली आहे,’ असा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.

अशाच मनसेच्या खेळींना वैतागून मी मनसे सोडली असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

डिसेंबरमध्ये रुपाली ठोंबरे यांनी मनसेतून राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकांच्या तयारीसाठी दौरे करत असतानाच पुणे दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला होता.

यावेळी राज ठाकरे यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात त्यांनी दिलेल्या बळ आणि प्रेरणेसाठी आभार मानले होते. तसंच राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असंही म्हटलं होतं. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

“मी संघर्ष करणारी आणि सर्वसामान्यांवर प्रेम करणारी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. मनसेमध्ये मी राज ठाकरेंकडे बघून राजकारणात आले. मी राज ठाकरेंना आणि कार्यकर्त्यांना माझ्या स्वार्थासाठी कधीही वाईट बोलणार नाही. पण माझी मते आणि मनातील खदखद वरिष्ठांच्या चौकटीत राहून राज ठाकरेंकडे व्यक्त केली आहे. मनसेमध्ये प्रचंड निस्वार्थी कार्यकर्ते आहेत. मी कुठे तरी जायचे आहे म्हणून मनसेला बदनाम करेल अशी मी स्वार्थी नाही. पण मी माझ्या कारणांमुळे राजीनामा दिली आहे,” असे रुपाली पाटील यांनी म्हटलं होतं.

“मला त्या गोष्टी परत परत बोलून वातावरण दूषित नाही करायचे. कारण त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कोणामध्ये बदल घडत नसेल तर मला तरी स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल,” अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली होती.

(File Photos)