
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईला धूळ चारली. या सामन्यात गुजरातने चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला.

चेन्नई संघ अगोदरच प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईवर या पराभवाचा फारसा परिणाम होणार नाही.

या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदाच संधी दिलेल्या मथिशा पथिराना या श्रीलंकन गोलंदाजाने आपला धडाकेबाज खेळ दाखवला.

त्याने भेदक गोलंदाजी करत पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली आहे. विशेष म्हणजे त्याने या सामन्यात एकूण दोन बळी घेतले.

या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या गाठताना गुजरातने आक्रमक फलंदाजी केली.

तर दुसरीकडे चेन्नईने गुजरातला रोखण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र यामध्ये चेन्नईला यश मिळाले नाही.

मथिशाने पहिल्याच सामन्यात पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर गुजरातचा दिग्गज फलंदाज शुभमन गिल याला पायचित केले. शुभमन १८ धावांवर बाद झाला.

त्यानंतर गुजरातच्या १०० धावा झालेल्या असताना त्याने हार्दिक पांड्यालादेखील बाद केलं. अवघ्या सात धावा झालेल्या असताना मथिशाच्या चेंडूवर हार्दिक झेलबाद झाला.

मात्र, धावसंख्या मोठी नसल्यामुळे शेवटी चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सने चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला.