दिवाळीत शहरी बाजारपेठा ग्राहकांनी ओसंडून वाहत असताना ग्रामीण भागात पूर्णत: विपरित स्थिती होती. अनेक ठिकाणी आठवडे बाजार ओस पडले होते. अतिवृष्टी, वादळी पावसाने शेतातील पिके आडवी झाली. सणासुदीला काही खरेदी करण्याची ऐपत राहिली नाही. नैसर्गिक संकटाने कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे विदारक रूप या काळात नाशिक विभागात ठळकपणे दिसले. ७.५ लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीची झळ ऐन दिवाळीत सोसावी लागली.

हेही वाचा- सोलापुरात शिंदे गटात प्रवेशघाई, तर ठाकरे गटात ‘शांतता’!

खरीप हंगामात पेरणी झालेल्या २७ लाख ७४८ हजार हेक्टरवरील पेरणीपैकी चार लाख २४ हजार ७१८ हेक्टरवरील पिके बाधित आहेत. म्हणजे एकूण पेरणी क्षेत्राच्या १५ ते १७ टक्के पिकांना फटका बसला. प्रत्यक्ष शेतात उभ्या असणाऱ्या पिकांची ही आकडेवारी आहे. चाळीत साठविलेला उन्हाळ कांदाही या फेऱ्यातून सुटला नाही. सततच्या पावसाने द्राक्ष आणि लागवडीखालील कांद्यावर झालेले परिणाम वेगळेच आहेत. कालांतराने ते समोर येतील. त्यामुळे त्याचा सरकार दप्तरी बाधित क्षेत्रात समावेशही होणार नाही.

या हंगामात सातत्याने इतका पाऊस झाला की, काही भागात शेतात बुडालेले भात, मका, सोयाबीन, भुईमुग मान वर काढू शकले नाहीत. या काळात एकट्या नाशिकमधून तब्बल १२४ टीएमसी (एक लाख २४ हजार ३० दशलक्ष घनफूट) पाणी जायकवाडीच्या दिशेने प्रवाहित झाले. म्हणजे जायकवाडी धरण तुडूंब होऊन ओसंडून वाहील, इतका विक्रमी विसर्ग झाल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. नगरमधून प्रवाहित झालेले पाणी वेगळेच आहे. जूनपासून आतापर्यंत विभागात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस झाला. नाशिक जिल्ह्याची सरासरी ९७७ मिलिमीटर असताना १३३२ (१३७ टक्के), धुळे जिल्ह्यात ५६२ असताना ७१३ (१२७), जळगावची ६६५ मिमीच्या तुलनेत ७२९ (११०) तर अहमदनगरची सरासरी ४९८ असताना ७४६ (१५० टक्के) पाऊस झाला. नंदुरबारचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद आहे. अनेक मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. पिके डोळ्यांसमोर गेली. ४५४ लहान-मोठी जनावरे, कुक्कुटपालन केंद्रातील हजारो पक्षी मरण पावले. साडेचार हजार घरांची पडझड झाली.

हेही वाचा- पश्चिम महाराष्ट्रातील नगदी पिकांवर पाणी

खान्देशात पूर्वहंगामी कपाशी पिकाबरोबर कापूस वेचणीवेळी बोंडांचे नुकसान झाले. तापी, गिरणा, अनेर नदीकाठच्या भागात काळ्या कसदार जमिनीत पाणी तुंबल्याने कापूस लाल, पिवळा पडून पानगळ झाली. कापूस पिवळा पडत असल्याने शेतकऱ्यांना तो सुकविणे क्रमप्राप्त ठरले. त्याची कमी दरात खरेदी झाली. शेतांमध्ये तळी साचली होती. मका, उडीद, मूग ही पिके हातची गेली. कापसासह मका, मूग, सोयाबीन, बाजरीच्या उत्पादनात घट होणार आहे. केळीवर कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना रोपे काढून फेकावी लागली. नंदुरबारमध्ये उसावर घोणस अळीचा प्रादुर्भाव झाला. नगर जिल्ह्यात मका, उडीद, तूर, ज्वारी, डाळिंब, सिताफळ, मका आदींचे नुकसान झाले. या भागात पीक विम्याच्या प्रचंड तक्रारी आहेत. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. पीक विम्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय बैठक नगर येथे घेण्याचे आश्वासन देण्यात आले. तलाठ्यांच्या पीक कापणी प्रयोगावरील बहिष्कारामुळे खरीपाचे नुकसान कसे ठरवणार, हा प्रश्न होता. अतिवृष्टीमुळे जनावरांना होणाऱ्या लम्पीचा धोका वाढला आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील नुकसानीचे पंचनामे होतील यावर लक्ष दिले. नाशिकमधील अतिवृष्टीग्रस्त भागात भेट दिल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगली, कोल्हापूरच्या धर्तीवर मदत देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात आजही त्याची प्रतीक्षा आहे.