scorecardresearch

चव्हाण घराण्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह

अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि चव्हाण घराण्याच्या निष्ठा शब्दाभोवती आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

ashok Chavan
चव्हाण घराण्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह (image – Ashok Chavan/fb)

छत्रपती संभाजीनगर : ‘हेडमास्तर’ ही शंकरराव चव्हाण यांची प्रतिमा. प्रशासकीय पकड मजबूत असणारा नेता या ओळखीबरोबरच पक्षनेतृत्वाशी जुळवून घेत कार्यकर्ता बांधणीची वेगळी शैली. त्यामुळे दोनवेळा मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत उंची गाठणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा मुलगा अशोक चव्हाण यांनाही महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्रीपद मिळाले. राजकीय पटावर एकूण शिस्तीला ‘राम-राम’ मिळत असताना आदर्श प्रकरणात ज्यांची बदनामी झाली आणि ‘अशोकपर्व’मधून ज्यांनी माध्यमांमध्ये ‘पेडन्यूज’ या नवसंकल्पनेला मूर्तरूप दिले, त्या चव्हाण घराण्यांची ओळख ‘निष्ठा’ या शब्दांत केली जात. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि चव्हाण घराण्याच्या निष्ठा शब्दाभोवती आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

शंकरराव चव्हाण यांचा जन्म १९२०चा. मूळ राहणारे पैठणचे. हैदराबादेत शिक्षण घेत त्यांनी कलाशाखेत पदवी मिळविली. पुढे वकील झाले. स्वामी रामानंद तीर्थांबरोबरच काँग्रेसच्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९५१-५२ मध्ये हादगाव विधानसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले. पुन्हा निवडणूक लढविण्याऐवजी वकिली करू, असे त्यांना वाटत होते. पण शामराव बोधनकर, राजाराम बाराडकर, विश्वनाथ खुरणे यांनी त्यांना राजकारणातच राहण्याचा सल्ला दिला. १९५२ साली नांदेड नगरपालिकेचे ते पहिले अध्यक्ष झाले. भाषावर प्रांत रचनेनंतर मुंबई राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून त्यांनी काम केले. १९५७ साली धर्माबाद मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला आणि उपमंत्रीपदही कायम राहिले. १९६२ मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांनी विजयी मिळविला आणि पुढे तो मतदारसंघ अशोकराव चव्हाण यांना सतत पाठिंबा देत राहिला. मुख्यमंत्रीपदाची शंकरराव चव्हाण यांची कारकीर्द मोठ्या शिस्तीची होती. त्या काळात मंत्र्यांनी सकाळी दहा वाजता यावे, ती वेळ पाळावी आणि दुपारनंतर अभ्यागतांच्या भेटी घ्याव्यात, असा त्यांनी नियम घालून दिला. तो पुढे अनेक वर्षं मंत्रालयाची शिस्त या श्रेणीत गणला गेला.

Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Ashok Chavan political journe
‘आदर्श’ गैरव्यवहार ते ‘आदर्शवादी’ भाजपपर्यंतचा अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress in Marathi
“…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला?
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress in Marathi
Ashok Chavan Resigned: “अशोक चव्हाण काल संध्याकाळी म्हणाले होते की…”, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितल्या रविवारच्या घडामोडी!

हेही वाचा – नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या पुनर्रचनेनंतर शिरोमणी अकाली दलाचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र, नेमकं राजकारण काय?

गांधी घराण्याशी जवळीक

इंदिरा गांधी यांच्या जवळचे व्यक्ती अशी शंकररावांची ओळख होती. १९७२ ते १९७५ या काळात कृषिमंत्री पद आणि १९७५ ते १९७७ पर्यंत मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हा पक्ष काढला होता. त्यांचे विचारविश्व आणि कार्यकर्ते मोठ्या वैचारिक समूहात वावरत असत. अगदी नरहर कुरुंदकरांनीही त्यांचा निवडणुकीत प्रचार केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात पाटबंधारे, उर्जा व कृषिमंत्रीपद सांभाळणाऱ्या शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडीसारखा प्रकल्प उभारून मराठवाड्याची एकाअर्थाने तहान भागवली. प्रशासकीय कारकीर्दीत अनेक नवीन उपक्रम करणाऱ्या आणि आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शंकरराव चव्हाण यांनी केंद्रातील अर्थमंत्रीपदही सांभाळले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात १९८४ ते १९८६ पर्यंत गृहमंत्री आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा शंकरराव चव्हाण यांचा मोठा राजकीय पट. या काळात निष्कलंक चारित्र्याचा व्यक्ती अशी उपमा त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांनीसुद्धा दिली होती.

अशोक चव्हाण यांना अनेक विषयांत गती. मराठी नाटके, चित्रपट इथपासून ते उत्तम वक्ता, अभ्यासू संवादकौशल्य आणि राजकीय नियोजनात वाकबगार अशी त्यांची कारकीर्द. १९९२ साली महाराष्ट्रात विधान परिषदेचे सदस्य. १९९९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत दाखल झाल्यानंतर भोकर मतदारसंघावर त्यांची पकड कायम राहिली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे अशोकराव चव्हाण ८ डिसेंबर २००८ रोजी मुख्यमंत्री झाले. त्यांना एक वर्षाचा कालावधी मिळाला. दुसऱ्यांदा २००९ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नोंदणी अभिलेखाचे संगणकीकरण, सातबाऱ्यांचे संगणकीकरण असे महत्त्वाचे निर्णय अशोकराव चव्हाणांनी घेतले.

हेही वाचा – पश्चिम उत्तर प्रदेशात आरएलडीची जागा घेण्यास समाजवादी पार्टी तयार, काँग्रेस अधिक जागांची मागणी करणार?

आरोपांमुळे बदनामी

त्यांनी घेतलेल्या निर्णयांपेक्षाही त्यांची बदनामी अधिक होत गेली. आधी आदर्श प्रकरणात त्यांचे नाव आले. भाजपने अलिकडेच जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेतही आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. २००९ च्या निवडणुकीत ‘अशोकपर्व’ नावाने एका दैनिकात प्रकाशित झालेल्या पुरवणीने माध्यमजगतातील पेडन्यूज प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. अशोकरावांची पुन्हा नव्याने बदनामी झाली. मध्यंतरीच्या काळात राहुल गांधींच्या जवळ राजीव सातव असताना अशोक चव्हाण परिघावर थांबले होते. मात्र, त्यांनी निष्ठा ढळू दिल्या नव्हत्या. मल्लिकार्जुन खर्गे पक्षाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे पक्षात महत्त्वही वाढू लागले होते. मात्र, त्यांनी दिलेला काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा चव्हाण घराण्यांच्या निष्ठेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करू लागला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी प्रचारसभा घेताना अनेकवेळा मंत्रीपद आणि दोनवेळा मुख्यमंत्रीपद मिळालेल्या अशोक चव्हाण यांना ‘लिडर’ म्हणता येणार नाही तर ते ‘डिलर’ आहेत, अशी टीका केली होती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर परिवारवादाचे आरोप केलेले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A question mark on the loyalty of the chavan families print politics news ssb

First published on: 12-02-2024 at 19:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×