केजरीवाल सरकारमधील समाजकल्याण मंत्री राज कुमार आनंद यांनी बुधवारी (१० एप्रिल)आम आदमी पक्षाच्या सदस्यपदाचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत. दिवसागणिक आपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राज कुमार आनंद यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षाला पुन्हा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीच्या दिवसांपासून ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर होते. त्यांच्या राजीनाम्याने पक्षातील त्यांचे सहकारीदेखील आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

आप सरकारवर आरोप

“काही काळापासून मला पक्षात अस्वस्थ वाटत होते. आतापर्यंत मला असे वाटत होते की, आम्हाला (आप) खोट्या आरोपांमध्ये गुंतवले जात आहे; पण दिल्ली उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयाने मला जाणवले की, कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी आणि अरविंद यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते म्हणाले होते की, राजकारण बदलले, तर देश बदलेल. परंतु, आज स्थिती वेगळी आहे. अत्यंत खेदाने मला हे सांगावे लागत आहे की, राजकारण बदलले नसून, राजकारणी बदलले आहेत,” असे राजीनामा दिल्यानंतर राज कुमार आनंद म्हणाले. गेल्या नोव्हेंबरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉडरिंगप्रकरणी राजकुमार आनंद यांच्या ठिकाणांची झडती घेतली होती. महसूल व गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा : भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

“पक्षात दलित नेत्यांचा आदर नाही”

राज कुमार आनंद हे दिल्लीतील पटेल नगरचे आमदार आहेत आणि ते जाटव समाजातील आहेत. आनंद यांनी दलित नेत्यांना पक्षात आदर नसल्याचा आरोपही केला. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांवर चालणारा व्यक्ती आहे आणि त्यांच्यामुळेच मी मंत्री झालो. पक्षात मला दलितांसाठी काम करण्याची संधी मिळत नसेल, तर पक्षात राहण्यात अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत राज कुमार आनंद?

एका पॅडलॉक कारखान्यात त्यांनी बालमजूर म्हणून काम केले होते. मात्र, आता ते उत्तर भारतातील टॉप रेक्झिन लेदर उत्पादकांपैकी एक आहेत. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांच्या मते, त्यांना सुरुवातीला राजकारणात फारसा रस नव्हता. त्यांच्या पत्नी वीणा यांनी २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पटेल नगरमधून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली होती. दोन वर्षांनंतर जेव्हा वीणा यांना तिकीट नाकारण्यात आले, तेव्हा आनंद आणि पक्षात मतभेद निर्माण झाले. वीणा यांनी स्वराज पक्षाच्या तिकिटावर पटेल नगरमधून निवडणूक लढवली होती; मात्र आपकडून त्यांचा पराभव झाला होता.

“आनंद हे एक व्यापारी आहेत. इतर राजकारण्यांप्रमाणे त्यांना कधीही राजकारणात रस नव्हता,” असे आपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, “परंतु त्यांच्या पत्नीला राजकारणात रस होता आणि त्यांना नेहमीच आमदार व्हायचे होते. जेव्हा मतभेद दूर झाले आणि ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांना पटेल नगरमधून तिकीट देण्यात आले आणि ते विजयी झाले.”

रेक्झिन व्यवसायाव्यतिरिक्त आनंद यांचे बांधकाम क्षेत्रातही व्यवसायिक हितसंबंध आहेत. २०२० च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी ७८.९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. ‘आप’मध्ये येण्यापूर्वी ते वंचित मुलांसाठी आनंद पथ फाउंडेशन चालवायचे. त्यांच्या जाणकारांनुसार, त्यांनी आंबेडकर पाठशाळादेखील सुरू केली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये राजेंद्र पाल गौतम यांनी एका धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते; ज्यानंतर समाजकल्याण खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या राजेंद्र गौतम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर २०२२ मध्ये आनंद यांना केजरीवाल सरकारमध्ये मंत्री करण्यात आले.

सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आणि ईडीचा छापा

२०२३ मध्ये सक्तवसुली संचालनालय (ईडीने) त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यांच्यावर सात कोटी रुपयांहून अधिक सीमाशुल्काच्या चोरीचा आरोप महसूल व गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केला होता. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोव्हेंबरमध्ये आनंद यांच्या निवासस्थानासह इतर ठिकाणांवर छापे टाकले. आनंद यांच्या राजीनाम्यावर बोलताना आपमधील अंतर्गत सूत्राने सांगितले, “ते खूप घाबरले होते. त्यांच्या घरावर टाकल्या गेलेल्या ईडीच्या छाप्यानंतर ते अडचणीत आले. त्यांनी याविषयी पक्षाच्या काही नेत्यांशीही चर्चा केली. या चिंतेने त्यांचे वजन सात ते आठ किलो घटले आणि ते दीर्घकाळापासून आजारी होते.”

हेही वाचा : भाजपाने किरण खेर यांचे तिकीट कापण्यामागे नेमके कारण काय?

भाजपामध्ये जाण्याची शक्यता?

त्यांनी पुढे सांगितले, “आनंद यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे प्रकरण वेगळे आहे. त्यामुळे राजीनाम्याचे नेमके कारण काय काय आहे हे अनेकांना माहीत नाही. त्यांच्या जवळच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, ते गेल्या आठवड्यात भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात आले आहेत.”