scorecardresearch

आदिती तटकरे व तटकरे कुटुंबासह रायगडमधील सर्व पक्षीय नेत्यांचा राजकीय दांडिया 

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोह्याच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिती तटकरे व तटकरे कुटुंबासह रायगडमधील सर्व पक्षीय नेत्यांचा राजकीय दांडिया 
(संग्रहित छायाचित्र)

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग– देशभरात नवरात्रोत्सवाची धामधूम सध्या सुरु आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी दांडिया गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. करोना निर्बंध मुक्तीनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त परिस्थितीत साजरा होणाऱ्या या नवरात्रोत्सवावर यंदा राजकारणाचाही साज चढतांना दिसतो आहे. एरवी राजकारणाच्या मैदानावर आपले कसब दाखवणारे राजकारणी या निमित्ताने गरब्यावर ठेका धरतांना पहायला मिळत आहेत.

जिल्ह्यात येत्या काही महिन्यात नगर पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. ज्या मार्गाने मतांची बेगमी करता येईल त्या सर्व संधी साधण्याचे राजकीय नेत्यांचे प्रयत्न आहेत. यंदाचा नवरात्रोत्सवही त्याला अपवाद नाही. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोह्याच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे हे दोघेही आमदार गरबा नृत्यावर ठेका धरतांना दिसतात. 

हेही वाचा >>> फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सरकारचा प्रस्ताव; अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे शिंदेंची कोंडी

रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रध्दा ठाकूरही चोंढी येथे आयोजित करण्यात आलेल्या दांडीया उत्सवात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी गरब्याच्या तालावर ठेका धरला होता. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगतापही सध्या ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देतांना दिसत आहे. सध्या हे सारे नेते तरुणाईच्या गाठीभेटीतून मतांची बेगमी करताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशमंडळांना भेटी देतांना दिसले होते. त्याआधी दहिहंडी उत्सवातही दोघांनी हजेरी लावली होती. यावरून महाविकास आघाडीच्या गोटातून दोन्ही नेत्यांवर टीकाही करण्यात आली होती. मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही हाच फंडा अवलंबल्याचे दिसून येत आहे.  नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी उत्सवात सहभागी होतांना दिसत आहे. एकूणच यामुळे गरबा आणि दांडीया उत्सवाला राजकारणाचा साज चढला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या