प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : जिल्ह्यात युतीमध्ये भाजपच्या वर्चस्वाखाली दबलेल्या शिवसेनेपुढे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संघटनात्मक वाढीचे शिवधनुष्य पेलावे लागेल. युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसेनेने अकोला शहर व बाळापूरमध्ये शक्तिप्रदर्शन केले. आदित्य ठाकरेंचा दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. जाहीर सभेमध्ये जिल्ह्यात विधानसभेसह लोकसभा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मात्र, तो पल्ला गाठणे सध्या तरी शिवसेनेसाठी अवघड प्रवास असून त्यासाठी अगाेदर संघटन वाढीवर जोर द्यावा लागेल. युवा नेत्याचा दौरा त्यासाठी परिणामकारक ठरेल का? याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात घडलेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्याचे पडसाद अकोला जिल्हा शिवसेनेत देखील उमटले. शिवसेनेचे जिल्ह्यातील बाळापूरचे एकमेव आमदार नितीन देशमुख यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी होत सुरत गाठले होते. दाेनच दिवसांत शिदेंची साथ सोडून ते पुन्हा शिवसेनेत परतले. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांचे शिवसेनेत महत्त्व वाढले आहे. या सर्व प्रकारामुळे त्यांना राज्यात ओळख मिळाली. आता जिल्हा शिवसेनेचे सर्व सूत्र आमदार नितीन देशमुख यांच्याकडे आहेत. दरम्यान, सलग १८ वर्षे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार राहिलेले गोपीकिशन बाजोरिया यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेब शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. शिवसेनेत अगोदरपासून आमदार देशमुख व बाजोरिया गटात वर्चस्वाची लढाई सुरू होती. त्यातच गोपीकिशन बाजोरियांच्या पराभवामुळे दोन्ही गटातील वाद टोकाला गेला. मातोश्रीपर्यंत तक्रारी झाल्यानंतरही पक्षनेतृत्वाने आमदार देशमुख यांच्यावरच विश्वास दाखवला. त्यामुळे बाजोरिया एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्याचा फटका अकोला शहरात शिवसेनेला बसला आहे. येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणूक होईल. त्यापूर्ण ताकदीने लढण्याची मोठी कसरत शिवसेनेला करावी लागणार आहे.

हेही वाचा : राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह यांचा पुणे दौरा आणि मनसेची अडचण

भाजपच्या वर्चस्वामुळे जिल्ह्यातील शहरी भागात शिवसेनेला फारसे बळ नाही. ग्रामीण भागात वंचित आघाडीनंतर सेनेची पकड आहे. शिवसेना फुटीचा शहरी भागावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी ग्रामीण भागातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत. बाळापूरची एकमेव जागा शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये जिंकली होती. आता स्वबळावर किंवा महाविकास आघाडीमध्ये ती जागा कायम राखण्यासह इतर ठिकाणी अस्तित्व निर्माण करण्याचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे राहणार आहे. बाळापूरच्या जाहीर सभेत शिवसेना नेत्यांनी आमदार, खासदार निवडून आणू, अशी भीष्मप्रतिज्ञा केली.

हेही वाचा : अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता

मात्र, त्यासाठी तळा-गाळात संघटन बांधणीचे सूक्ष्म जाळे शिवसेनेला विणावे लागणार आहे. आदित्य ठाकरेंनी आपल्या दौऱ्यात शिवसैनिकांचे उत्साह वाढविण्याचे कार्य केले. अकोला शहरात शिवणी विमानतळ ते श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत रॅली काढून त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधला. बाळापूरच्या सभेत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना लक्ष्य करताना शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात हात घातला. त्यामुळे त्यांच्या सभेची चांगलीच चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी पोषक ठरणारा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray visit to akola district benefit shiv sena in vidhan sabha and lok sabha print politics news tmb 01
First published on: 09-11-2022 at 12:09 IST