Loksabha Election 2024 पश्चिम बंगालमधील मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार श्रीरूपा मित्रा-चौधरी यांनी आपल्या अनोख्या प्रचाराने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी)देखील गोंधळात पडली आहे. मंगळवारी मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे जाहीर सभेला संबोधित करताना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मित्रा-चौधरी यांच्यावर टीका करीत त्यांना निर्लज्ज म्हटले. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) बुधवारी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, ‘निर्भयादीदी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा उमेदवारावर अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे टीएमसीच्या राष्ट्रीय सरचिटणीसांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मालदा येथील इंग्लिश बाजार विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान आमदार मित्रा-चौधरी यांची लढत काँग्रेसचे ईशा खान चौधरी व टीएमसीचे शाहनवाज अली रेहान यांच्याशी होणार आहे. काँग्रेस उमेदवार ईशा खान चौधरी हे विद्यमान खासदार अबू हसम खान चौधरी यांचे पुत्र आहेत. ते २००९ पासून ही जागा जिंकत आले आहेत. अबू हसम खान ‘दलू दा’ या नावाने प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते ए. बी. ए. गनी खान चौधरी यांचे भाऊ आहेत. टीएमसी उमेदवार ईशा खान चौधरी यांनी ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात त्यांनी वारंवार आवाज उठविला आहे.

हेही वाचा : भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?

कोण आहेत श्रीरूपा मित्रा-चौधरी?

श्रीरूपा मित्रा-चौधरी या माजी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या व महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय विधी साक्षरता अभियानात भाग घेतला. २००८ मध्ये त्यांनी कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम केले.

२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्थापन केलेल्या बलात्कार, तस्करी आणि महिलांवरील हिंसाचार यांवरील विशेष कार्य दलाचे अध्यक्षपद भूषवले. त्यामुळेच त्यांना ‘निर्भयादीदी’ ही ओळख मिळाली. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या टीएमसीच्या तिकिटावर मालदा येथून निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, त्यांना दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून टीएमसीने तिकीट दिले; जिथे त्यांना केवळ ८०३ मते मिळाली.

निर्भयादीदींचा भाजपा प्रवेश

“मी ‘निर्भया ग्राम’ (निर्भय गाव) उपक्रम सुरू केला होता; ही महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी एक सामाजिक चळवळ होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी मला ‘निर्भयादीदी’ हे नाव दिले. आज माझ्या खऱ्या नावापेक्षा जास्त लोक मला ‘निर्भयादीदी’ म्हणूनच ओळखतात,” असे चौधरी यांनी सांगितले. दोन वर्षांनंतर चौधरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मालदा दक्षिणमधून आठ हजारांहून अधिक मते मिळाली; परतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्या इंग्लिश बाजार येथून विजयी झाल्या. इंग्लिश बाजार मतदारसंघ मालदा लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग आहे.

अनोखा प्रचार

चौधरी या आपल्या अनोख्या प्रचारामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मालदा मतदारसंघात सर्वत्र गुलाबी फलक लावण्यात आले आहेत. काही फलकांवर चौधरी यांच्या प्रतिमेबरोबर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छायाचित्रे आहेत; तर काहींवर पंतप्रधान मोदी आणि चौधरी यांची छायाचित्रे आहेत. सर्व गुलाबी फलकांवर ‘निर्भयादीदीला मत द्या’ असे लिहिण्यात आले आहे. त्यांच्या प्रचार वाहनावरदेखील हे फलक लावण्यात आले आहेत.

आम्ही आमची थीम म्हणून गुलाबी रंगाची निवड केली आहे. कारण- हा रंग महिलांची शक्ती दर्शवतो. आम्ही गुलाबी पॅम्प्लेट्स, पोस्टर्स, बॅनर, फलक व प्लेकार्ड्स तयार केली आहेत. ‘निर्भयादीदीला मत द्या’ म्हणजे महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी मतदान करा, असे भाजपा उमेदवार चौधरी म्हणाल्या आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी भाजपा उमेदवाराच्या अशा आगळ्यावेगळ्या प्रचाराने लोकांचे लक्ष वेधले जात आहे.

हेही वाचा : ‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?

“त्यांच्या प्रचारशैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिलांच्या हक्कांसाठी लढण्याचा त्यांचा मागील अनुभव आणि सुरू असलेला प्रचार यांमुळे यावेळी ही लढत खूप कठीण असणार आहे, अशी कबुली मालदा येथील एका टीएमसी नेत्याने दिली. मंगळवारी (२३ एप्रिल) मालदा शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभा घेऊन, तर शुक्रवारी (२६ एप्रिल) पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेऊन चौधरी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मालदा दक्षिणमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.