BJP voter fraud allegations काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने भाजपा आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करीत आहेत. कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता केरळमध्येही मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतचोरीचा मुद्दा उचलून धरणाऱ्या काँग्रेसला भाजपा नेत्याच्या एका वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा आरोप करण्याची संधी मिळाली आहे. आता काँग्रेसकडून केरळमधील भाजपाचे एकमात्र खासदार सुरेश गोपी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गोपी हे केंद्रीय राज्यमंत्रीदेखील आहेत. मुख्य म्हणजे ते दक्षिणेकडील राज्यातून निवडून आलेले भाजपाचे पहिले खासदार आहेत. वादग्रस्त विधान करणारे भाजपा नेते कोण आहेत? त्यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद काय? काँग्रेसने काय आरोप केलेत? जाणून घेऊयात.
भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. गोपाळकृष्णन यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले, “ज्या जागांवर आमचा विजय होण्याची शक्यता आहे, तिथे आम्ही जम्मू आणि काश्मीरमधून लोकांना आणू, त्यांना एक वर्ष राहू देऊ आणि ते मतदान करतील याची खात्री करू. भविष्यातही आम्ही असेच करू. जर जम्मू आणि काश्मीरमधील एखाद्या व्यक्तीला माझा विजय पाहायचा असेल. तर तो येथे येऊन माझ्यासाठी मतदान करण्याकरिता एक वर्ष राहिल्यास त्यात काय गैर आहे?” या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेसने नक्की काय आरोप केले?
- काँग्रेसने आरोप केला की, सुरेश गोपी यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी भाजपाने ६०,००० बनावट मतदारांची नोंदणी केली आहे.
- काँग्रेसने त्यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
- त्यांनी या प्रतिज्ञापत्रात आपण मतदारसंघात सहा महिने वास्तव्य केल्याचे नमूद केले आहे.
- त्रिशूर लोकसभा मतदारसंघात ७४ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी ७८ टक्क्यांपेक्षा कमी होती. यावरूनदेखील भाजपावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
बी. गोपाळकृष्णन यांनी म्हटले, “लोकसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक काँग्रेस समर्थकांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे काँग्रेसची मते कमी झाली. २०१९ मध्ये काँग्रेसची मते ४.१६ लाख होती, जी कमी होऊन ३.२७ लाख झाली. ही मते कुठे गेली? काँग्रेसला याचे उत्तर देण्याची गरज आहे,” असेही ते म्हणाले.
काँग्रेसकडून मतदार याद्यांची तपासणी
काँग्रेसने म्हटले आहे की, ते आता गेल्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपाने नोंद केलेल्या बनावट मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार याद्यांची तपासणी करीत आहेत. पक्षाचे त्रिशूर येथील जिल्हाध्यक्ष जोसेफ ताजेत यांनी आरोप केला, “आम्ही आतापर्यंत १२०० पैकी ३७ बूथची तपासणी केली आहे. २०२४ च्या मतदार याद्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जारी केलेल्या नवीन याद्या यांची तुलना केल्यास अनेक नावे गायब झाल्याचे दिसते आहे. आम्हाला प्रत्येक बूथमधून सुमारे २० ते ३० नावे गायब असल्याचे आढळले आहे. हे मतदार लोकसभा निवडणुकीसाठी आणले गेले होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांच्या मूळ पत्त्यांवर परत गेले असतील,” असे ते म्हणाले.
काँग्रेसने असाही आरोप केला की, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नवीन मतदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा तपशील देण्यास नकार दिला आहे. माजी काँग्रेस आमदार अनिल अकारा म्हणाले, “जिल्हा प्रशासनाने तपशील देण्यास नकार दिला आहे आणि त्यांनी याबाबत, ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आयटी अॅप्लिकेशन डेटा बँकेतील भौतिक मालमत्ता आहे. त्यामुळे तो तपशील देऊ शकत नाही, असे विचित्र उत्तर दिले आहे.” त्यांनी अर्जाद्वारे तपशिलाची मागणी केली होती.
अनिल अकारा यांनी या प्रकरणात सत्ताधारी सीपीआय(एम)चा सहभाग असल्याचा आरोप केला. “भाजपा आणि सुरेश गोपी यांना कागदपत्रे सार्वजनिक करायची नव्हती; पण राज्य सरकार त्याच मार्गावर का विचार करीत आहे? भाजपाच्या बनावट मतदार प्रकरणात जिल्हा प्रशासनाने अडथळा म्हणून का उभे राहिले पाहिजे? हे दर्शवते की, सीपीआय(एम) सरकार बनावट मतदारांची नोंदणी करण्यात सहभागी होते,” असे ते म्हणाले.