पिंपरी : आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढून पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनीही शहरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. एके काळी बालेकिल्ला असलेले शहर ताब्यात घेण्यासाठी पवार यांनी पहिल्यांदाच थेट शहरवासीयांसोबत संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पवार शनिवारी चिंचवड येथे जनसंवाद उपक्रमाअंतर्गत थेट नागरिकांच्या पाणी, वीज, रस्त्यासंदर्भातील समस्या जाणून घेणार आहेत. या संवादातून अजितदादांकडून मतांची पेरणी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर काँग्रेस नंतर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसचे नेते दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहराची सूत्रे आली. सलग १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेवर होती. पवार यांच्या कलानेच शहरातील संपूर्ण निर्णय होत असे. मात्र, २०१७ मध्ये भाजपने अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला.
महापालिकेतील सत्ता खेचून घेतली. १२८ नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेत राष्ट्रवादीचे केवळ ३६ नगरसेवक निवडून आले. विकास कामे करूनही पिंपरी-चिंचवडकरांनी नाकारल्याची खंत पवार हे सातत्याने जाहीरपणे बोलावून दाखवतात. महापालिकेतील सत्तेच्या जोरावर भाजपने शहरावर घट्ट पकड निर्माण केली. विधानपरिषदेचे दोन आणि विधानसभेचे दोन असे शहरात भाजपचे चार आमदार असून सर्वात मोठा पक्ष आहे. आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढून शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार शहर भाजपने केला आहे.
अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही शहरात प्रतीस्पर्धी असलेल्या दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील संघर्ष कमी झाला नाही. त्याउलट त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे पवार यांना आव्हान देत असून जाहीरपणे तीव्र विरोध करतात.
भाजपला रोखण्यासाठी पवार यांनी शहरातील एकमेव आमदार असलेल्या अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद दिले. परंतु, पक्ष वाढीसाठी कोणताही फायदा होत नसल्याची भावना ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पवार यांनी स्वत: शहरात लक्ष घातल्याचे दिसते. शहराचे १५ वर्षे कारभारी राहिलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या पवार यांनी कधीही पिंपरी-चिंचवड शहरात ‘जनसंवाद’ घेतल्याचे ऐकिवात नाही.
आगामी निवडणुकीत महापालिकेवर सत्ता आणून शहर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. त्यातूनच त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘पिंपरी-चिंचवडकरांनो, चला आपल्यात संवाद घडवून आणूया, तुमच्या समस्या ऐकण्यासाठी मी येतोय. पाणी, वीज, रस्ते, इतर कोणतीही शासकीय अडचण असो, सांगा थेट मला’ असे आवाहन करत लोकांना शनिवारी जनसंवादला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
पवार हे जनसंवादच्या माध्यमातून मतांची पेरणी करण्याचा प्रयत्न करत असले, तरी शहरातील संघटनेची वीण उसवली आहे. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी एक वर्षे होऊनही अद्यापही पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर केली नाही. शहरात संघटनेकडून कार्यक्रम राबिवल्याचे दिसत नाही. त्याउलट मित्र पक्ष भाजपकडून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. त्यांचे प्रभाग स्तरावर काम सुरु असते. त्यामुळे केवळ अजितदादांच्या एकट्याच्या प्रयत्नांमुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची सत्ता येईल का, असा प्रश्न राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
भाजप-अजित पवार गटातच लढत?
‘नको बारामती, नको भानामती’, ‘शहरातील निर्णय शहरातच’ असा २०१७ च्या महापालिका निवडणुकीत प्रचार करणारी भाजप, आमदार महेश लांडगे हे अजित पवार गटासोबत युती करण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी स्वबळावर लढण्याची शिफारस प्रदेश नेतृत्वाला केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटातच लढत होण्याची चिन्हे आहेत.