पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी १० जून रोजी पुण्यात पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात असलेल्या ताकदीचे प्रदर्शन करण्याबरोबरच आपलाच पक्ष खरा ‘राष्ट्रवादी’ असल्याचे दाखविण्यात कोणतीही कसूर राहता कामा नये, यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पुण्यात तळ ठोकला आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुका आणि पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता हा योग जुळून आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने पुण्यात बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात भव्य स्वरूपात कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याचे नियोजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वच प्रमुख सवंगडी हे पुण्यात ठाण मांडून आहेत. त्यामुळे सध्या पुण्यात ‘राष्ट्रवादी’ची लगीनघाई सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी पक्षाचा स्थापना दिनाचा कार्यक्रम हा अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात घेतला होता. मात्र, यावेळी महापालिका निवडणुका असल्याने पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सध्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात ये-जा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष एकत्र येण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चर्चांना थेट उत्तर देण्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा टाळले आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार ठोस भूमिका मांडणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
पुण्याकडे यजमानपद
पक्षाचा वर्धापनदिन पुण्यात होत असल्याने या कार्यक्रमाचे यजमानपद पुण्याकडे आले आहे. पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची पुनर्रचना केली आहे. दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमण्यात आले आहेत. प्रत्येक शहराध्यक्षासाठी दोन कार्याध्यक्ष असणार आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी नगरसेवक सुभाष जगताप हे दोन शहराध्यक्ष असून, पूर्व भाग टिंगरे यांच्यकडे, तर पश्चिम भाग हा जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे. कार्याध्यक्षांपैकी प्रदीप देशमुख यांच्याकडे हे पद कायम ठेवण्यात आले आहे. माजी नगरसेविका रुपाली ठाेंबरे-पाटील, माजी नगरसेवक अक्रुर कुदळे आणि हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने नियुक्ती झालेले पदाधिकारी हे सध्या तयारीमध्ये गुंतले आहेत.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे प्रमुख नेते हे पुण्यात हजेरी लावत असताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची लुडबूड बालेवाडी येथे सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा दाखविण्यासाठी काही इच्छुक हे बालेवाडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवसभर थांबून आहेत. उमेदवारी मिळण्यासाठी चेहरा ओळखीचा व्हावा, यासाठी इच्छुकांची धडपड सुरू असल्याचे चित्र बालवाडीत पहायला मिळत आहे.