अमरावती : महापालिकेसाठी नऊ वर्षांपुर्वी तयार करण्यात आलेल्या ४ सदस्यीय प्रभाग रचनेवरच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे भाजपचा हुरूप वाढला आहे. महापालिकेतील सत्तेच्या चाव्या मिळवायच्या असतील, तर एका पॅनलमध्ये किमान दोन किंवा तीन चांगले चेहरे देण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न राहणार आहे. ४५ हून अधिक माजी नगरसेवकांचा भरणा असलेल्या भाजपसाठी चार सदस्य प्रभाग रचना अनुकूल मानली जात असली, तरी इतरही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
८७ सदस्यीय अमरावती महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ४५ नगरसेवक निवडून आले होते. आमदारद्वय पती पत्नी संजय खोडके आणि सुलभा खोडके यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेले बळ, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांचा पक्षबदल या घडामोडी परिणामकारक मानल्या जात आहेत.
माजी खासदार नवनीत राणा यांच्या भाजप वर्तुळातील वाढत्या प्रभावामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांची बंडखोरी, इच्छूक उमेदवारांची भाऊगर्दी, युवा स्वाभिमान पक्षाचा संभाव्य हस्तक्षेप यातून भाजपचे नेते मार्ग कसा काढणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. जगदीश गुप्ता यांच्यासह शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाला बळ मिळाले असले, तरी भाजपची ताकद जास्त तेथे स्वबळावर निवडणुकीची वेळ आली, तर शिंदेसेनेची कसोटी लागणार आहे.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजप ४५, काँग्रेस १५, एमआयएम १०, शिवसेना ७, बसप ५, युवा स्वाभिमान पक्ष ३, रिपाइं (आठवले) १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. तत्कालीन भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख आणि प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात महापालिकेची निवडणूक लढविण्यात आली होती. भाजपने ६५ उमेदवार रिंगणात उतरविले होते, त्यापैकी ४५ जण निवडून आले. हा ‘स्ट्राईक रेट’ चांगला मानला गेला. नेतृत्वासाठी धडपडत असलेल्या काँग्र्रेसने त्यावेळी ८६ उमेदवार रिंगणात आणले होते, पण मुस्लीम बहुल भागात एमआयएमने ताकद पणाला लावली आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला. त्यावेळी संजय खोडके हे काँग्रेसमध्ये होते, पण पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर महापालिकेच्या राजकारणातून त्यांनी अंग काढून घेतले होते.
परिस्थिती बदलाचा फायदा कुणाला?
गेल्या आठ वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये स्वगृही परतले. संजय खोडके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची धुरा सांभाळली. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके यांनी डॉ. देशमुख यांना पराभूत करून विधानसभेत प्रवेश मिळवला. संजय खोडके हे विधानपरिषद सदस्य बनले. आता डॉ. सुनील देशमुख आणि संजय खोडके यांच्यात महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वर्चस्वाची लढाई दिसून येणार आहे.
दुसरीकडे, भाजपचे नेते प्रवीण पोटे यांच्याकडे कोणतेही मोठे पद नाही. नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षासोबत युती होईल, असे जाहीर केले आहे. राणा सोबत असतील, तर भाजपसोबत युती करणार नाही, अशी भूमिका संजय खोडके यांनी घेतल्याने महायुतीत घुसफूस वाढली आहे.