अमरावती : लोकसभा निवडणुकीच्‍या आखाड्यात महायुतीच्‍या उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्‍यक्ष आमदार बच्‍चू कडू यांचे राजकीय भवितव्‍य या निवडणुकीच्‍या निकालावर ठरणार आहे. महायुतीचे घटक असूनही बच्‍चू कडू यांनी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेणे ही बच्‍चू कडूंसाठी राजकीय अपरिहार्यता की विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी आखलेली व्‍यूहरचना, याची चर्चा रंगली आहे. ही जोखीम स्‍वीकारताना त्‍यांनी राणा विरोधकांना एकत्र आणण्‍याचे राजकीय कौशल्‍य दाखविले. ते कितपत यशस्‍वी होते, हे निकालानंतर दिसणार आहे.

प्रचाराच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यात येथील सायन्‍सकोर मैदानाच्‍या आरक्षणावरून भाजप आणि प्रहार यांच्‍यात झालेल्‍या संघर्षाआधी राणा दाम्‍पत्‍याशी त्‍यांचे अनेकवेळा खटके उडाले होते. राणा दाम्‍पत्‍य आणि बच्‍चू कडू हे एकमेकांवर टीकेची संधी सोडत नाहीत. पण, मंगळवारी सायन्‍सकोर मैदानावर घडलेल्‍या नाट्याने ही लढाई टोकदार केली आहे. आधी सायन्‍सकोर मैदान प्रहारच्‍या सभेसाठी आरक्षित केले जाते, त्‍यानंतर सुरक्षेचे कारण देऊन ते नाकारले जाते. यात प्रशासनाची भूमिका नैसर्गिक न्‍यायाची नाही, हे घसा दुखेपर्यंत ओरडून सांगूनही बच्‍चू कडू यांना माघार घ्‍यावी लागली. पण, त्‍यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपविरोधी प्रचाराची आयती संधी त्‍यांना मिळाली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातून सहानुभूती मिळवण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न राहणार आहे.

हेही वाचा – “नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती

हेही वाचा – केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

रवी राणा यांनी आपल्‍याला अटक व्‍हावी, यासाठी कट रचला होता. मैदान नाकारल्‍यानंतर आपल्‍या हातून चूक घडावी, याची ते वाट पाहत होते. कोणताही डाग लागू नये, म्हणून आम्ही दोन पाऊले मागे घेतली, हे त्‍यांचे वक्‍तव्‍य बरेच काही सांगून जाणारे आहे. आगामी विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी त्‍यांना प्रहार जनशक्‍ती पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे. महायुतीत राहून सत्‍तेचा लाभ मिळवता येऊ शकतो, पण गुवाहाटी प्रकरणानंतर मतदारांमध्‍ये उमटलेली नकारात्‍मक प्रतिमा कशी पुसणार, हा बच्‍चू कडू यांच्‍यासमोरील प्रश्‍न आहे. आता ते महायुतीत आहेतही आणि नाहीतही. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, असे ते सांगतात. महायुतीतून आम्‍ही बाहेर पडलेलो नाही. त्‍यांनी आपल्‍याला बाहेर काढावे, असे ते आव्‍हान देतात. त्‍यांचा खरा संघर्ष हा भाजपसोबत आहे. शेतकऱ्यांचा आक्रमक, आंदोलक नेता म्‍हणून त्‍यांनी मिळवलेली ओळख हरविण्‍याच्‍या आधी त्‍यांनी पुन्‍हा आक्रमक राजकारण सुरू केले आहे. बच्‍चू कडू यांनी प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांना उमेदवारी दिली, ते मूळचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक. दिनेश बुब यांच्‍यासाठी सभा, पदयात्रांचा धडाका लावणाऱ्या बच्‍चू कडू यांच्‍यासाठी ही अस्तित्‍वाची लढाई आहे. निवडणुकीच्‍या निकालावर त्‍यांची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे.

Story img Loader